Friday, 10 November 2017

दिनारा कास्को - आर्किटेक्ट, पेस्ट्री शेफ कि अदाकारा?

फोटो सौजन्य: दिनारा कास्को 

      पेस्ट्री किंवा केक म्हणलं कि आपल्या डोळ्यांसमोर काय येतं?

केक म्हणाल तर अर्थातच चौकोनी, आयताकृती, गोल किंवा फार फार तर एखाद्या कार्टून कॅरॅक्टरचा आकार. पेस्ट्री तर आपल्याला फारश्या वेगळ्या आकारात दिसतच नाहीत...आयताकृती किंवा त्रिकोणी. आपण भारतीय तसे फारसे केक वेडे नाही. आपल्याकडे केक म्हणजे वाढदिवस हे एक समीकरणच आहे. आताशा तो इतर प्रसंगांमध्येही दिसू लागला आहे पण ते म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे असे मला वाटते. असो, मुद्दा तो नाही. पण जिच्याबद्दल तुम्ही पुढे वाचणार आहात तिचं काम बघून केकचा किंवा पेस्ट्रीचा समावेश आपल्या आनंदाच्या, उत्सवाच्या प्रसंगांमध्ये जरूर व्हावा असं तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही.

         दिनारा कास्को, या युक्रेनियन महिलेने कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्या आर्किटेक्चरल ज्ञानाचा वापर ३ वर्षं नेदरलंडमधील एका कंपनीत डिझायनर आणि फोटोग्राफरची  नोकरी करत केला. पण तिला खरी आवड होती ती पेस्ट्री बनवण्याची. याचा शोध तिला वयाच्या १७ व्या वर्षापासून करत असलेल्या जवळपास १६ देशांच्या भ्रमंतीनंतर लागला. मग पुढे आई झाल्यावर तिच्याकडे जो रिकामा वेळ होता त्यात तिला तिच्या या पेस्ट्री बनवण्याच्या आवडीला खरा न्याय देता आला. तिच्या आर्किटेक्चरल ज्ञानाची सोबत होतीच. मग काय, स्थापत्यकला आणि पाककला यांच्या एका दुर्मिळ संयोगातून एका अत्यंत विलोभनीय आणि रूचकर गोष्टीचा जन्म झाला.


फोटो सौजन्य: दिनारा कास्को

फोटो सौजन्य: दिनारा कास्को

फोटो सौजन्य: दिनारा कास्को


आता हे फोटो पाहून तुमच्या लक्षात आलं असेलच कि असे केक्स बनवणे हे काही सोपं काम नाही. आणि ते अगदी खरं आहे. पण अवघड काम सोपं करायलाच तर आपण वेगवेगळं तंत्रज्ञान शोधतो, नाही का? असंच एक तंत्रज्ञान आहे आणि ते म्हणजे थ्री डी प्रिंटींग (3D Printing). तुम्ही कदाचित हा शब्द ऐकला असेलही आणि त्या बाबतीत तुम्हाला माहितीही असेल. पण ज्यांना हे नक्की काय प्रकरण आहे हे जाणून घ्यायचे असेल त्याांच्यासााठी माहिती देतो.

      आपण जेव्हा कागदावर किंवा कापडावर काहीही छापतो तेव्हा ते टु डी प्रिंटींग (2D Printing) असतं. म्हणजेच त्याला दोन मिती (dimensions) किंवा अक्ष (axes) असतात. सहसा आडव्या अक्षाला X आणि उभ्या अक्षाला Y म्हणतात. आपण शाळेत वापरलेला ग्राफ पेपर डोळ्यांसमोर आणा. आता कल्पना करा कि एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवलेल्या कागदावर आपण तिसर्‍या अक्षाला (Z) धरून वरच्या दिशेने कागद जोडत आहोत. काय होईल? एक गठ्ठा तयार होईल. असं समजा कि तो एक ठोकळा आहे. म्हणजेच द्विमितीय गोष्टीला जर आपण तिसरी मिती जोडली तर त्यापासून एक वस्तू तयार होते.

थ्री डी प्रिंटींगमध्ये हेच होते. एका ठराविक मटेरियलचे एकावर एक थर टाकले जातात आणि शेवटी आपल्याला एक घन वस्तू मिळते. पण हे थर कुठे आणि कसे टाकायचे हे ती वस्तू डिझाईन करणारी व्यक्ती ठरवते. त्यासाठी डिझाईन सॉफ्टवेयर वापरली जातात. उदाहरणादाखल खलील व्हिडिओ बघा:

दिनाराने हेच तंत्रज्ञान वापरून केकरूपी अशा काही कलाकृती तयार केल्यात कि बघणार्‍याच्या डोळ्यांचे पारणे फिटते. म्हणजे ती चक्क केकचे डिझाईन सॉफ्टवेयर वापरून करते आणि त्याचे मोल्ड थ्री डी प्रिंटींग तंत्रज्ञानाने बनवते. स्थापत्य शास्त्रातील अलगोरीदम्स, वेगवेगळे चित्रविचित्र आकार हे तिने केकच्या रूपाने सादर केले आहेत. थोडक्यात क्लिष्ट वाटणार्‍या या गोष्टी तिने रंजक आणि रुचकर बनवल्या आहेत. तिच्या आणखी काही मंत्रमुग्ध करणार्‍या कलाकृती बघा:

फोटो सौजन्य: दिनारा कास्को

फोटो सौजन्य: दिनारा कास्को

फोटो सौजन्य: दिनारा कास्को

आपल्या साचेबद्ध नजरेतून बघितलं तर हे केक वाटतात का? पण ते आहेत आणि ते खायचेच केक आहेत. तोंडात बोटं घालायला लावणारा हा व्हिडिओ बघा:
      आहे ना गंमत? हे केक म्हणजे स्थापत्य शास्त्रातील मॉडेल्स वाटतात पण ती स्टील, सिमेंट किंवा काचेची नसून ती मेरिंग, जिलेटीन आणि चॉकलेटची आहेत! एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते कि तिने त्रिकोणमिती, व्होरोंनी डायग्राम आणि बायोमिमीक्री यांसारख्या भूमितीय रचनांची तत्त्वं केक बनवण्यासाठी वापरली आहेत.

२०१७ च्या सॅन मिगुएल रिच लिस्ट मध्ये आता तिने स्थान पटकावलं आहे. ही जगभरातल्या अशा लोकांची लिस्ट असते ज्या एक वेगळ्या प्रकारची संपत्ती बाळगून असतात. हा त्या एकमेवाद्वितीय लोकांचा समुदाय असतो ज्या ऐहिक गोष्टींपेक्षा विविध अनुभवांना अधिक महत्व देतात. दिनाराबद्दल या लिस्ट मध्ये असं लिहिलं आहे कि तिच्यासारखे कल्पक आणि अभिनव कलाकार खूपच थोडे आहेत. ही क्लिष्ट आणि अचूक निर्मिती केवळ केक नाही तर ती खाद्य संस्कृतीतील एक कला आहे आणि दिनारासाठी एक संपन्न आयुष्य जगण्याचे माध्यम आहे.

असं काही पाहिलं, वाचलं कि आपोआप नतमस्तक व्हायला होतं. केक आणि पेस्ट्री बनवण्याच्या या कलेला एका वेगळ्याच उंचीवर दिनाराने नेऊन ठेवले आहे. आता तुम्हीच ठरवा तिला आर्किटेक्ट म्हणायचं, शेफ म्हणायचं कि एक अदाकारा?


फोटो सौजन्य: दिनारा कास्को

फोटो सौजन्य: दिनारा कास्को

फोटो सौजन्य: दिनारा कास्को

(अधिक माहितीसाठी कृपया www.dinarakasko.com या संकेतस्थळाला भेट द्या. )

Thursday, 9 November 2017

काट्याने काटा काढा!

हे भारी आहे. जेव्हा तुम्हाला एखादा स्कॅम ईमेल येतो तो फक्त me@rescam.org या ईमेल अॅड्रेस वर फॉरवर्ड करा आणि निश्चिंत व्हा. एक बॉट (म्हणजे एक प्रकारचे सॉफ्टवेअर जे इंटरनेटवर काही ठराविक कामे स्वतःहून आपोआप करत राहते) त्या स्कॅमरला ईमेल्स पाठवून गुंतवून ठेवतो जेणेकरून त्या स्कॅमरला सहज जाळ्यात अडकणार्‍या माणसांना लुटण्यास खूप कमी वेळ मिळतो.

      सादर आहे Re:scam – स्कॅम ईमेल्सना उत्तरं देण्यासाठी बनवण्यात आलेला एक एक आर्टिफिशियली इंटेलिजंट ईमेल बॉट. अखंड प्रश्न आणि गोष्टी सांगत Re:scam स्कॅमर्सचा वेळ वाया घालवतो जेणेकरून त्यांना खर्‍या माणसांच्या मागे लागण्यास खूप कमी वेळ मिळतो.

      जर तुम्हाला आलेला एखादा ईमेल तुम्हाला स्कॅम वाटत असेल तर तो me@rescam.org ला फॉरवर्ड करा आणि ते मग तिथून पुढे त्याला हाताळतील. ते तुम्हाला Re:scam आणि त्या स्कॅमर मध्ये झालेल्या ईमेल संवादाचा संक्षेपदेखील पाठवतील – कधी कधी तो फारच मजेशीर असतो.

      एक सुशिक्षित आर्टिफिशियली इंटेलिजंट चॅट बॉट नियुक्त करून स्कॅमर्सचा वेळ आणि साधनं काबीज करून फसवेगिरीला बळी पडणार्‍या लोकांना मदत करण्यासाठी उचललेलं Re:scam हे पाऊल आहे. आता स्कॅम ईमेल जंक किंवा डिलिट न करता तुम्ही तो Re:scam ला फॉरवर्ड करू शकता जो अखंड संवाद चालू ठेवू शकतो – किंवा स्कॅमर उत्तर देणं बंद करत नाही तोवर त्याच्याशी संवाद साधत राहू शकतो.

      Re:scam वेगवेगळी रूपं घेऊ शकतो, खर्‍या माणसांसारखा विनोद आणि व्याकरणातील चुका करू शकतो आणि अमर्यादित स्कॅमर्सना एकाच वेळी गुंतवून ठेवू शकतो, म्हणजेच तो ईमेल संवाद शक्य तितका वेळ चालू ठेवू शकतो. Re:scam स्कॅमर्सची खेळी त्यांचा वेळ वाया घालवून उधळवून लावेल आणि त्यांना होणारे नुकसान वाढवेल.

      हा इंटरेस्टिंग व्हिडिओ बघा. आली रे आली आता आपली पाळी आली...

Tuesday, 17 October 2017

निसर्गातील प्रेम

शांत रात्री सूर्यही निजलेला, थंडी गुलाबी धुंदशी हवा,
धरणीला भेटण्या उतरला, शुभ्र ढगांचा थवा

प्रातः समयी चालू असता प्रेम कूजन दोघांचे,
जागलेल्या सूर्यास कुठे दिसेना अस्तित्व ढगांचे

सहज बघावे म्हणूनी, शोधण्या ढगांना धाडली किरणे
पोचली ती धरतीवरी, जणू कळपातील धावती हरणे

पाहून किरणांना ढगांची झाली पळता भुई थोडी
विलग झाली गुंतलेली युगुलाची जोडी

जागी झाली धरणी आनंद झाल्याचे भासवे
पण पानांवरती दिसती ढगांची दवरुपी आसवे

सरली थंडी झाला सुरू कडक उन्हाळा
ढग शुष्कसे झाले पाहून ग्रीष्मातील ज्वाळा

सूर्याची दाहक ती आग, भेगा पडती धरणीला
देई ती अग्निपरीक्षा, येणार ढग हे ठाऊक तिजला

तृषार्त जाहली धरणी, नजर लावूनी गगनाकडे
मग्न किती तो सूर्य, लक्ष नसे त्याचे दबकत येणाऱ्या ढगांकडे

पाहूनी प्रिय धरणीचे ते हाल, वाहू लागती ढगांच्या अश्रुधारा
झाकोळूनी सूर्याला, उतरवती त्याचा पारा

पाहुनी विद्युलता अन ऐकुनी गडगडाट ,
सूर्य लपतसे कुठल्याशा कोनाडयात

प्रेमी युगुलाच्या पुनर्मिलनाने होतसे दंग,
आनंदूनी मग स्वतःच उधळे इंद्रधनुचे रंग

निसर्गातील हि किमया जणू वाटे चमत्कार
कि प्रेमाची महती शिकवी तो किमयागार?

Wednesday, 20 September 2017

एकहाती वैश्विक अणुयुद्ध टाळणार्‍या रशियन वीरास आदरांजलीफोटो सौजन्य: गुगल इमेजेससोव्हिएत सैन्यातील अधिकारी स्टानिस्लाव पेट्रोव ज्यांनी संगणकाऐवजी अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवला आणि एक हाती वैश्विक अणुयुद्ध टाळले ते वयाच्या ७७ व्या वर्षी निधन पावले.

१९८३ मध्ये त्यांचा देशात, सोविएत युनियनमध्ये आधीच धोक्याचा इशारा दिलेला होता; त्यांनी एक कोरियन एयर जेट पाडलेले असल्याने प्रतिवार होण्याची शक्यता होती. अशातच लेफ्टनंट कर्नल साहेबांनी संगणकावर एक सूचना पाहिली जी हे दर्शवत होती कि अमेरिकेने त्यांच्यावर आण्विक मिसाईलचा हल्ला चढवला आहे. त्यांच्याकडे मिसाईल सोडल्याची खात्रीलायक माहिती नव्हती आणि पुढची कृती ठरवण्यासाठी केवळ काही मिनिटांचा अवधी होता.

जेव्हा शीतयुद्ध ऐरणीवर होते तेव्हा २६ सप्टेंबरला मॉस्कोजवळच्या सेर्पुखोव - १५ बंकरवर ते अधिकारी म्हणून होते. केवळ साडेतीन आठवड्यांपूर्वीच सोविएत सैन्याने एक बोइंग ७४७ पाडले होते ज्यात त्यातील सर्वच्या सर्व २६९ लोक मृत्युमुखी पडले होते. उपग्रहाद्वारे मिळणारी आगाऊ धोक्याची सूचना बघून वरिष्ठांना युएसएसआरवर होणार्‍या होऊ घातलेल्या हल्ल्याची खबर देणे हि लेफ्टनंट कर्नल पेट्रोवची जबाबदारी होती. असा हल्ला झाल्यावर, अमेरिकेवर आण्विक प्रतिहल्ला चढवण्याची युद्धनीती सोविएत युनियनने आखलेली होती. ती परस्पर विश्वस्त विध्वंस सिद्धांताची गरज होती.

मध्यरात्रीनंतर ००४० वाजता, बंकरच्या संगणकांनी सूचना दिली कि एक अमेरिकन मिसाईल सोविएत युनियनच्या दिशेने येत आहे. लेफ्टनंट कर्नल पेट्रोवनी तर्क लावला कि ती संगणकाची चूक असावी कारण जर अमेरिकेला सोविएत युनियनवर हल्ला करायचा असता तर त्यांनी केवळ एक मिसाईल सोडली नसती - तर बर्‍याच मिसाईल्स एकाचवेळी सोडल्या असत्या. शिवाय, उपग्रह प्रणालीची अचूकता पूर्वी प्रश्न उपस्थित करणारी होती, म्हणून त्यांनी ती सूचना चूक म्हणून खारीज केली आणि असा निष्कर्ष काढला कि अमेरिकन सैन्याने कुठलीच मिसाईल सोडलेली नाही.

तथापि, थोड्या वेळानंतर, संगणकांनी दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी मिसाईल सोडल्याची सूचना दिली. तरीही पेट्रोवना वाटलं कि संगणक चूक आहे पण त्यांच्या शंकेला पुष्टी देणारा इतर कुठलाही महितीचा स्त्रोत उपलब्ध नव्हता. २२ मिनिटांत त्यांना खात्री पटली असती. सोविएत युनियनच्या जमीनीवरील रडार मध्ये क्षितिजापलीकडील मिसाईल्स हेरण्याची क्षमता नव्हती, म्हणजेच जमीनीवरील रडार जेव्हा तो धोका निश्चितपणे हेरणार होता तेव्हा खूप उशीर होणार होता.

पेट्रोवची द्विधा मनःस्थिती अशी होती: खर्‍याखुर्‍या हल्ल्याकडे जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर सोविएत युनियन कुठलीही आगाऊ सूचना न मिळता किंवा प्रतिहल्ल्याची संधी न मिळता आण्विक शस्त्रांनी उद्ध्वस्त होणार होतं. दुसर्‍या बाजूला, त्यांनी जर न झालेल्या हल्ल्याची खबर वर दिली असती तर त्यांच्या वरिष्ठांनी शत्रूवर तेवढाच भयंकर हल्ला चढवला असता. दोन्ही घटनांमध्ये लाखो लोक मेले असते. ते चूक असले असते तर सोविएत युनियनवर आण्विक मिसाईल्सचा वर्षाव झाला असता हे समजूनही, पेट्रोवनी अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवायचा ठरवलं आणि संगणकाची सूचना चुकीची आहे हे जाहीर केलं.

प्रचंड तणावाखाली असूनही पेट्रोवचा निर्णय निकोप होता आणि त्यामुळे एक भीषण आण्विक युद्ध टळलं.

संभाव्य आण्विक संकट टाळूनसुद्धा, संगणक प्रणालीची सूचना न मानून लेफ्टनंट कर्नल पेट्रोव यांनी आज्ञेचा भंग केला होता आणि सैनिकी शिष्टाचाराची अवज्ञा केली होती. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांची सखोल उलटतपासणी करण्यात आली.

सोविएत सैन्याने पेट्रोवना त्यांच्या या कृतीबद्दल कुठलीही शिक्षा दिली नाही पण त्यांचा सत्कार किंवा सन्मानही केला नाही. त्यांच्या कृतींमुळे सोविएत सैन्यातील त्रुटी समोर आल्या होत्या ज्यामुळे त्यांच्या वरिष्ठांची बदनामी झाली होती. कागदपत्र नीट न ठेवल्याचे कारण देऊन त्यांना अधिकृतरित्या तंबी देण्यात आली. एक भरवश्याचा अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहणं बंद झालं आणि त्यांची एके काळी उज्ज्वल असलेली सैनिकी कारकीर्द संपुष्टात आली. त्यांना एक कुठलेसे कमी महत्वाचे पद देण्यात आले आणि शेवटी ते सैन्यातून निवृत्त झाले.

पेट्रोवनी नंतरचा काळ तसा गरिबीतच काढला. त्यांनी त्यांचं निवृत्त आयुष्य फ्रायाझिनो नावाच्या गावात व्यतीत केलं. त्यांनी म्हणलं आहे कि त्यांनी त्या दिवशी जे केलं त्यासाठी ते स्वतःला वीरपुरुष समजत नाहीत, "मी फक्त माझं काम करत होतो."

२१ मे २००४ रोजी सान फ्रान्सिकोस्थित असोसिएशन ऑफ वर्ल्ड सिटीजन्सने कर्नल पेट्रोवला भीषण संकट टाळण्यात महत्वाची भूमिका निभावल्याबद्दल त्यांचा वर्ल्ड सिटीजन किताब एक चषक आणि १,००० डॉलर्सच्या रूपाने दिला. जानेवारी २००६ मध्ये पेट्रोव न्यू यॉर्कला गेले जिथे असोसिएशनने त्यांना संयुक्त राष्ट्रसंघात गौरवले.

"द मॅन हू सेव्हड द वर्ल्ड" नावाचा चित्रपटही या सत्य घटनेवर आधारीत आहे. त्याची झलक नक्कीच तो थरार जागवते. चित्रपटाची झलक बघण्यासाठी इथे क्लिक करा.

अशा या खर्‍या योद्धयाला आणि वीरपुरुषाला सलाम!


(माहिती सौजन्य: जी एन नेटवर्क)Monday, 14 August 2017

किससे हैं जीतना, क्या हैं जीतना

किससे हैं जीतना,
क्या हैं जीतना,
मिलेगा तो उतनाही
लिखा हैं नसीब में जितना।

इस दुनिया में नहीं
कोई बड़ा या छोटा
जो खाली हाथ आया था
वह खाली हाथ ही लौटा।

कुछ पाने के लिए
दौड़ लगी हैं दिनभर
कल की सोचतें सोचतें
करवटे बदली रातभर।

हासिल क्या करना था
आख़िर तक समझ न पाया
सांसे थम गयी तो
शरीर मिट्टी हो गया।

जीतना हैं तो दिलों को जीतो
जिससे जीवन सफल हो
अंत तो सभी का एक ही है
बनो ऐसी मिट्टी जिसकी कोई महक हो।

Monday, 10 April 2017

बखेडाकाका

          एका रविवारी दुपारी खूप दिवसांनी भेटलेल्या एका मित्राकडे सपत्निक जाऊन जेवण्याचा योग आला. मित्राला आणि त्याच्या कुटुंबीयांना अनेक वर्षांनी भेटत होतो. त्यामुळे वेळ मजेत जात होता. वहिनींच्या हाताला चव छान आहे हे जेवल्यावरच कळलं. साधारण दीड दोनच्या सुमारास जेवणं उरकून आम्ही मीठा मसाला पानाचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा देत बसलो होतो. गप्पा छान रंगात आल्या होत्या आणि भर दुपारी भरपेट जेवणानंतर तिथून निघावसं वाटत नव्हतं. वाटलं मित्राने म्हणावं "थांब रे. जरा थोडं आडवं होउन जा. गप्पा मारू. किती दिवसांनी भेटला आहेस. काय गडबड आहे, तसाही आज रविवारच. घरी जाऊन झोपशीलच त्याऐवजी इथेच पड थोडा वेळ". या विचारांची गुंगी चढतच होती इतक्यात मित्राच्या समोरच्या घरातून जोरजोरात भांडणाचा आवाज येऊ लागला. मी आधी बायकोकडे पाहिलं. तिलाही त्या आवाजाची जाणीव झाली होती. तिने हलकेच खांदे उडवले आणि "काही कल्पना नाही" असं सुचवलं. मग मी मित्राकडे पाहिलं. तो पान चघळत निवांत बसला होता. वहिनींच्या चेहऱ्यावरही फारशी चिंता दिसली नाही. मला वाटलं हे बहुदा नेहमीचंच असावं म्हणून ते दोघे निश्चिन्त बसलेत. समोरून भांडणाचा आवाज येतंच होता. बहुदा नवरा बायकोचं भांडण असावं असं एकूण जे कानावर पडत होतं त्यावरून मी अंदाज बांधला.

          पूर्वीच्या चाळींतल्या भांडणात जसा भांडणातला शब्द न शब्द ऐकू यायचा आणि भांडणाऱ्यांनासुद्धा लाइव्ह ऑडियन्स मिळायचा तसा आजकालच्या फ्लॅट संस्कृतीत ऐकू येत नसला तरी काहीतरी भांडण चालू आहे याचा अंदाज येतो. बऱ्याचदा तेव्हाच कळतं कि शेजारी कोणीतरी राहतं! तर या शेजारी दांपत्याचा उच्च रवातील संवाद लांबत गेला तसा मी दबक्या आवाजात (जणू आमचं बोलणं शेजाऱ्यांना ऐकू जाणार होतं या भीतीने) मित्राला विचारलं "अरे, हे काय?" तो शांतपणे म्हणाला "नवविवाहीत आहेत, नुकतेच शिफ्ट झालेत. लक्ष देऊ नको. शांत होईल आवाज थोड्या वेळात." मी स्मितहास्य केलं आणि गप्प बसलो. बायकोकडे पाहात नव्हतो कारण ती मला "चल निघू या आता" असं खुणावेल याची मला खात्री होती आणि मला ते नको होतं. आमच्यात शांतता पसरलेली पाहून वाहिनी म्हणाल्या "अहो काही टेन्शन घेऊ नका, बखेडाकाका येतीलच इतक्यात". हे आमच्यासाठी काहीतरी नवीनच होतं. मी आणि बायको प्रश्नार्थक मुद्रेने एकमेकांकडे बघत होतो. आमची नेत्रपल्लवी चालू असताना समोरच्या घराची बेल वाजल्यासारखी वाटली. थोडावेळ गंभीर शांतता पसरली. मित्र आता जांभया देत होता. वाहिनी स्वयंपाकघरात काही आवरायचे राहीले आहे का ते बघण्यासाठी गेल्या. आता मात्र आम्ही निघायला हवं होतं. पण 'बखेडाकाका' हे काय प्रकरण आहे हे जाणून घ्यायची मला उत्सुकता होती.

          बायकोने मला खुणावलं "चल निघू या". जरा अनिच्छेनेच मीही उठलो. उठता उठता मी मित्राला विचारलं, "अरे वहिनी मघाशी कुणा बखेडाकाकांबद्दल बोलल्या. हे कोण काका?" मित्राने जांभई आवरण्यासाठी डावा हात तोंडावर आणि उजवा हात दोन तीनदा गोल फिरवला. मला वाटलं तो मला निघायला सांगतो आहे. मी आणि बायको हसत हसत दाराकडे निघालो. आम्ही जरा खजील झालो. वाटलं अरे आपण मैत्रीचा थोडा गैरफायदा घेतला कि काय. बिचाऱ्याची रविवारची दुपारची झोप लांबवली. ती लांब जांभई संपल्यावर मित्र म्हणाला "अरे कुठे निघालात दोघं? मी म्हणत होतो आत जरा पडू. गप्पा मारता मारता सांगतो काकांबद्दल." ते शब्द माझ्या कानावर पडले आणि घामेजलेल्या चेहऱ्यावर थंड वाऱ्याची झुळूक आल्यावर जसे वाटते तसे वाटले. मला मनातून प्रचंड आनंद झाला होता आणि आता मित्राची खोली आणि त्यातील बेड दिसू लागली होती. पण इच्छा असूनही मी काही उड्या मारून आनंद व्यक्त करू शकत नव्हतो. मी म्हणालो  "अरे कशाला? राहू दे. येऊ पुन्हा केव्हा तरी." अशा वेळी बायका चाणाक्षपणे नवऱ्याच्या मनातलं कसं काय ओळखू शकतात हे कोडं मला अजून सुटलेलं नाही कारण बायकोने त्रासिक नजरेने मान हलवली आणि मनात म्हणाली असावी "याचं अवघड आहे". मित्राने वहिनींना आवाज देऊन सांगितलं "अगं, आम्ही जरा या खोलीत पडून गप्पा मारतोय. तु आणि वहिनी पण पडा." आम्ही पुन्हा एकदा ते टाळण्याचा क्षीण प्रयत्न केला पण माझ्या मनात मित्राने काय म्हणावं असा थोड्या वेळापूर्वी जो विचार आला होता त्यातील वाक्य वहिनींनी पूर्ण केली आणि मग काय आमच्या थांबण्यावर शिक्कामोर्तबच झाला. मग मी बायकोकडे न पाहताच मित्रासोबत साळसूदपणे खोलीत गेलो. तेवढ्यात समोरच्या घराच्या दारात उभं राहून कुणीतरी कुणाला हसत हसत "बाय, सी यु" असं म्हणल्याचं कानी पडलं.

          बिछान्यावर आडवं झाल्यावर मित्राने बखेडाकाकांबद्दल सांगायला सुरुवात केली.

          "बखेडाकाका हे सेनेतील एक निवृत्त अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी इथेच स्थायिक व्हायचं ठरवलं. ते इथे एकटेच राहतात. त्यांच्या पत्नीचं निधन दोन वर्षांपूर्वी झालं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी पण दोघेही US मध्ये स्थायिक झालेत. बखेडाकाका कट्टर देशभक्त असल्याने आणि उरलेल्या आयुष्यात तिथे कशाला जायचं हा विचार मनात असल्याने त्यांची काही तिकडे जायची इच्छा होत नाही. म्हणून मुलांनीही मग त्यांना बोलावणं सोडून दिलंय. दिवाळी किंवा न्यू इयरला दोघेही येतात त्यांना भेटायला. पत्नीच्या स्वर्गवासानंतर काका काही दिवस सतत कसल्याशा विचारांत असायचे. बहुदा उरलेलं आयुष्य आता कसं व्यतीत करावं याचा विचार त्यांच्या डोक्यात घोळत असावा.

          एक दिवस असेच विचारमग्न बसलेले असताना त्यांना त्यांच्या शेजारच्या घरातून चढ्या आवाजात भांडणाचा आवाज आला. बराच वेळ कुणीतरी भांडत होतं. त्यांनी विचार केला दारं खिडक्या बंद करावीत आणि झोपावं. पण ते जागेवरून उठले आणि त्यांच्या डोक्यात एक वेगळाच विचार आला. बहुदा त्यांचं सैनिकी डोकं जागं झालं असावं. ते स्वयंपाकघरात गेले, फ्रिज उघडून त्यात ठेवलेले दोन चॉकलेटचे बार काढले. त्यांना लहान मुलं खूप आवडत असल्याने त्यांच्या घरी कुणी लहान मूल आलंच तर त्याला देण्यासाठी म्हणून ते कायम फ्रिजमध्ये चॉकलेट बार ठेवत असत. ते घेऊन ते ज्या घरातून भांडणाचा आवाज येत होता त्या घरासमोर गेले आणि तिथली बेल वाजवली. अर्थातच बेल ऐकून भांडण थांबलं. घरातल्या पुरुषाने दार उघडलं. समोर काकांना पाहून त्याचा चेहरा थोडा त्रासला. पण ते वयस्कर आहेत, शेजारी आहेत, एकटेच राहतात हे बहुदा त्याला माहिती होतं. म्हणून मग त्याने त्यांना आत घेतलं."

          "त्या माणसाने जरा त्राग्यानेच विचारलं, "क्या चाहिए अंकल?" काका सरदारजी असल्याने त्यांच्याशी सगळे हिंदीतच बोलतात. काकांनी त्याला भांडणाऱ्या स्त्रीला बोलवायला सांगितलं. ती बहुतेक त्याची बायको होती." माझ्या मित्राने मधेच एक जांभई दिली. मला वाटलं आता हा झोपणार. पण काकांची गोष्ट रंजक असल्याने मी मधेच दुष्टपणे विचारलं "पुढे काय झालं?" त्याला झोप लागू नये हा माझा दुष्ट हेतु त्याला बहुदा कळला नसावा कारण त्याने उठून फॅनचा वेग थोडा वाढवला आणि पुढे सांगायला सुरुवात केली.

          "आता काका आणि ते भांडणारे नवरा बायको एकमेकांच्या समोरासमोर. क्षणभर कोणी कोणाशी बोललं नाही. पण मग काका नवऱ्याच्या दिशेने पुढे सरकले आणि त्याला स्वतःकडे खेचून मीठी मारत म्हणाले "सॉरी पुत्तर सॉरी. माफ कर देना मुझे" नवरा पेचात पडला. त्याला कळेना काय चाललंय काकांचं ते. "ओके अंकल ठीक हैं। लेकिन बात क्या हैं?" त्यानंतर काका त्याच्या बायकोकडे वळले आणि तिच्याही बाबतीत तेच केलं. तिलाही वडीलकीच्या नात्याने जवळ घेऊन तिची माफी मागितली. आता मात्र दोघांनाही प्रश्न पडला. काय घडतंय ते काही केल्या कळेना. दोघांचीही माफी मागून झाल्यावर मग काका थोडे मागे सरले. एव्हाना घडत असलेल्या प्रकाराने त्या दांपत्याला ते थोड्या वेळापूर्वी भांडत होते याचा थोडा विसर पडला होता. दोघांचंही लक्ष आता काकांकडेच होतं. मग काका म्हणाले, "मैंने सॉरी क्यू कहा ये जानना हैं तो पहले एक दुसरे को गले लगाकर सॉरी बोलना पडेगा". असं म्हणल्यावर त्या दोघांना पुन्हा भांडणाची जाणीव झाली. पण काका समोर असल्याने एक दुसऱ्याला सॉरी म्हणण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. शेवटी दोघंही कसंबसं सॉरी म्हणले एकमेकांना. मग काकांनी त्या दोघांनाही चॉकलेटं दिली. आता हे जरा बालीशपणाचं होतं पण घडत असलेले प्रसंगच असे होते कि ते गारुड्याच्या पुंगीवर डोलणाऱ्या सापासारखे काका जे सांगतील ते ऐकत होते आणि तसंच करत होते.

          काका त्या दोघांकडे बघून छानसं हसले आणि निघू लागले. पण तेवढ्यात त्या नवऱ्याने त्यांना अडवलं आणि म्हणाला "चॉकलेट के लिये थँक्स अंकल लेकिन आपने बताया नहीं आपने सॉरी क्यु बोला!" काका वळले आणि त्याला म्हणाले "उसके लिये मुझे थोडा बैठ के बताना पडेगा। टाइम हैं?" आता त्या नवरा बायकोच्या डोक्यातून भांडणाचा विषय बाजूला राहिला होता आणि काका काय सांगतात याची उत्सुकता वाढली होती.

          "देखो बेटा झगडा होता हैं और बढता जाता हैं क्यूँ कि दोनो को लगता हैं सामनेवाले कि गलती हैं। दोनों में से जो भी पहले सॉरी बोलेगा वो हारेगा। असल में हार जीत तो किसी कि नहीं होती। जितता हैं वो गुस्सा और हारतें हैं वो हिंमत और विश्वास। इन्सान तो पीछे रह जाते हैं, आगे तो उनकी निगेटिव्ह फ़िलींग्स जाती हैं। मतलब इन्सानियत हार जाती हैं। मुझे ये अच्छा नहीं लगता। जो मैंने किया वो आप दोनों भी कर सकते थे लेकिन जब दिमाग गरम होता हैं तो इन्सान को कुछ अच्छा नही सुंझता। इसलिये मैंने आके आप दोनों के अंदर बसे हुए इन्सान को जगाया और उसकी आवाज सॉरी बोलकर बाहर आयी। सॉरी तो असल में आप दोनोनें एक दुसरे को बोला हैं।

          बेटा आर्मी से हूँ। मौत को बडे करीब से देखा हैं। हम रोज जीते हैं मतलब रोज मौत को हरातें हैं। लेकिन एक दिन ऐसा आता हैं जब मौत जीत जाती हैं। तब कुछ नही कर सकते। ना किसी को सॉरी बोल सकते हो ना किसी को थँक यु। एक बात कभी नही भूलना कि मौत कि जीत का दिन कल का भी हो सकता हैं और आज का भी।" नवरा आणि बायको स्तिमित होऊन काकांकडे बघतच राहिले आणि त्यांना त्यांची चूक कळली. किती क्षुल्लक कारणावरून ते भांडत होते हे त्यांना पटलं. मलाही काकांचं ते तत्वज्ञान भावलं आणि मित्राने हिंदीत केलेलं वर्णन ऐकताना एखादा हिंदी चित्रपट पाहिल्यासारखं वाटून गेलं.

          "अरे पण काका हे सगळं तिथे बोलले हे तुला कसं माहिती?" माझा एक अनावश्यक प्रश्न.

          मित्राने सांगितलं कि त्या प्रसंगानंतर काकांचं जणू आता एकच ध्येय आहे ते म्हणजे या सोसायटीत भांडणं, तंटे, बखेडे होऊ द्यायचे नाहीत. आणि त्यांच्या या प्रयत्नात ते कमालीचे यशस्वी झालेत. बखेडा कोणाचाही असो, बाप - मुलगा, नवरा - बायको, भाऊ - भाऊ, जावा - जावा, सासू - सून अगदी कोणाचाही. काका तिथे पोचणार, साधारण त्याच पद्धतीने तो बखेडा मिटवणार आणि सलोखा निर्माण करणार. ज्या घरात भांडण सुरु असतं त्या घराचे शेजारीच आता काकांना मध्यस्थी करण्याची विनंती करतात आणि काका आनंदाने ती स्वीकारतात. त्यांच्या या अनोख्या प्रयत्नांमुळेच त्यांना आता सगळेजण 'बखेडाकाकाच' म्हणतात. खरंतर ते मेजर जनरल सिंग आहेत. एकदा ते त्याचं आणि वहिनींचं भांडण मिटवायलाही आले होते हे त्याने शेवटी सांगितलं. काकांच्या भांडण मिटवण्याचा पद्धतीबद्दल मित्राला इथंभूत माहिती कशी काय ते त्यामुळे कळलं. गप्पा मारता मारता चहाची वेळ कधी झाली ते कळलंच नाही. वहिनींनी मित्राला चहा झाल्याचा आवाज दिला आणि आम्ही परत बाहेरच्या खोलीत येऊन बसलो.

          आता माझ्या मनात बखेडाकाकांच्या कुतुहलाची जागा त्यांच्याबद्दलच्या आदराने आणि कौतुकाने घेतली होती. आम्ही चहा घेतला आणि आता मात्र निघालो. मित्राच्या प्रेमपूर्वक आदरातिथ्याचे आभार मानले आणि त्याचा निरोप घेतला. तो आणि वाहिनी आम्हाला सोडायला म्हणून खाली पार्किंग पर्यंत आले. गाडीत बसणार तोच मित्राचा आवाज कानावर पडला "गुड इव्हिनिंग अंकल। कैसे हैं आप?" समोरून साधारण सत्तरीतले एक सरदारजी येत होते. उंचेपुरे, भारदस्त शरीरयष्टी, झुपकेदार दाढी मिशा पण डोळ्यात तेवढीच प्रेमळ आणि तरल भावना. एक कमालीची विनम्रता त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात दिसत होती. त्यांनी मनापासून मित्राच्या अभिवंदनाचा स्वीकार केला आणि हसले. मित्राने ओळख करून दिली "अरे, हे बखेडाकाका ज्यांच्याबद्दल मी तुला सांगितलं ते." क्षणभर मी स्तब्ध झालो काय बोलावे ते सुचेना. एखादी आरती म्हणावी आणि ती संपल्यावर साक्षात देव समोर प्रकट व्हावा अशी भावना मनात आली. पण मी स्वतःला सावरलं आणि त्यांनी हस्तांदोलनासाठी पुढे केलेला हात हातात घेतला. त्यांचं ते कडक हस्तांदोलन आजही माझ्या लक्षात आहे. हस्तांदोलन करून त्यांनी एक छोटीशी मीठीही मला मारली. तेव्हा कळलं त्या मीठीतली उबही भांडणं मिटवायला बऱ्याच अंशी कारणीभूत ठरत असावी. का कोण जाणे पण मला त्यांच्या पाया पडावंसं वाटलं. मी त्यांचे चरण धरले आणि त्यांनीही छान आशीर्वाद दिला "जीता रह पुत्तर". एरवी टीव्ही, सिनेमाच्या माध्यमातून अगदी सर्वसामान्यपणे आपल्या कानावर पडणाऱ्या या शब्दांचा काही वेगळाच अर्थ मला तेव्हा कळला.

          परतीच्या वाटेवर बायको बोलत होती. पण माझं मन बखेडाकाकांच्यातच अजून गुंतलेलं होतं. मी आपलं बायकोच्या बोलण्यावर नुसतं "हं हं" करत होतो. बखेडाकाकांचं व्यक्तिमत्व, तत्वज्ञान, तंटे मिटवण्याची आणि सलोखा वाढवण्याची कळकळ हे सगळंच किती जगावेगळं होतं. वाटलं असे बखेडाकाका प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक सोसायटीत, प्रत्येक गल्लीत असते तर किती बरं झालं असतं. त्यांना न कसली गुर्मी ना कुठचा अहंभाव. आयुष्यभर देशरक्षण केलेला माणूस आज माणसातल्या माणुसकीचं रक्षण करतो आहे. भांडण, मारामाऱ्या, युद्ध हे सगळं मिथ्या आणि क्षणिक आहे याची पुरेपूर जाण त्यांना झाली आहे. काही बखेडे सोडवताना त्यांच्याशी कुणी उद्दामपणेही बोललं असेल, "आमच्या वैयक्तिक आयुष्यात लक्ष घालू नका" असंही म्हणलं असेल. पण ज्याच्यातील गर्वाला प्रेमाने जिंकलं आहे अशा त्या माणसाला तसं म्हणणाऱ्याची करुणाच वाटली असेल. आणि त्यांनी अधिक प्रेमाने त्याला आपलंसं केलं असेल. म्हणूनच ते त्यांच्या या कार्यात कमालीचे यशस्वी झाले असणार.

          शेवटी कुणाकडून तरी दुखावल्या गेलेल्या माणसाला काय हवं असतं हो. त्याला त्या व्यक्तीने स्वीकारावं, जवळ करून मायेचा स्पर्श करावा आणि विनम्रपणे सॉरी म्हणावं. काकांनी नेमकं हेच जाणलं होतं आणि ते सगळ्यांना आनंदी ठेवू शकत होते. त्यांची पद्धत जरी थोडीशी विचित्र वाटत असली तरी परिणामकारक होती. भलेही ती सभ्यासभ्यतेच्या धूसर सीमारेषेवरची असेल पण निर्माण झालेला ताणतणाव सोडवण्याची ताकद तिच्यात होती. आपण लहानपणी मित्रांशी, भावंडांशी भांडतो पण लगेच विसरतोही आणि पुन्हा खेळायला लागतो. काकांचं चॉकलेट देणं कदाचित त्या लहानपणाचीच आठवण करून देण्यासाठी असावं.

          मी कुठेतरी ऐकलं होतं कि कुठल्याशा अरब देशात म्हणे जेव्हा रस्त्यावर गाड्यांचा अपघात होतो तेव्हा दोन्ही गाड्यांचे चालक गाडीतून उतरतात, हस्तांदोलन करतात, एकमेकांना सॉरी म्हणतात आणि आपापल्या मार्गाने चक्क निघून जातात. किती छान पद्धत आहे ही. तत्परतेने माफी मागायची आणि दुसऱ्यानेही लगेच माफ करायचं. भांडण तंट्याचा प्रश्नच नाही आणि रस्त्यावरील इतरांनाही कसलाच त्रास नाही. आपल्याकडील अशा प्रसंगांत काय होतं हे न वर्णिलेलंच बरं. परवा तर टीव्हीवरच्या कुठल्याशा बातमीत पाहिलं कि एक दुचाकी आणि रिक्षा समोरासमोर आल्या आणि आधी कोण जाणार यावरून दोन्ही चालकांची डोकी इतकी भडकली कि गोष्ट हाणामारीपर्यंत गेली. शेवटी एकाला हॉस्पिटलमध्ये पोचवलं पण त्याचा तिथे मृत्यु झाला! हे किती भयंकर आहे. असंच मागे एकदा वाचनात आलं होतं कि कुठल्याशा ढाब्यावर जेवण नीट नाही दिलं म्हणून त्या माणसाने वेटरचा खूनच केला. बाप रे!

          बाहेरचंच कशाला घेऊन बसलात. प्रत्येकाने आपापल्या घरात जरी डोकावून पाहिलं तरी लक्षात येईल कि कधी कधी आपल्या भांडणांची आणि तंट्यांची किती छोटी आणि क्षुल्लक कारणं असतात. पण काही घरांमध्ये आपण त्या क्षुल्लक गोष्टीही कायमच्या दुराव्याला किंवा अबोल्याला कारणीभूत होत असलेल्या आपण पाहतो. हे खूपच विदारक सत्य आहे. वादविवाद हे व्हावेत पण त्यातून काही विधायक घडणार असेल तर.

          अशा बातम्या आजूबाजूला असताना बखेडाकाकांसारखी माणसं अगदी देवासमान भासतात. मी तर म्हणेन बखेडाकाकांसारखी माणसं जरी प्रत्येक ठिकाणी नसली तरी आपण हे विसरता कामा नये कि आपल्या प्रत्येकातच एक बखेडाकाका असतात. पण खूपच कमी वेळा किंवा अगदी नाहीच म्हणलं तरी चालेल आपण त्यांना जागृत करतो किंवा त्यांची आठवण आपल्याला होते. हि विचार करण्यासारखी गोष्ट नाही का? कुठल्याही भाषेत अगदी छोट्याशा शब्दाने माफी मागता येते. म्हणजे बघा ना मराठीत "माफ करा", हिंदीत "माफ किजियें", इंग्रजीत "सॉरी". किती लहान लहान शब्द पण जीभेला ते जड का वाटतात? चर्चेचा रोख भांडणांकडे वळतो आहे असं वाटलं कि लगेचच आपण का माफी मागत नाही? मला आवडलेली पद्धत म्हणजे मी वर नमूद केलेली अरब देशातील प्रथा. संभाषणाची सुरूवातच "सॉरी" म्हणून करायची आणि दुसऱ्यानेही त्याला लगेच माफ करून टाकायचं. भांडण तंटा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

          हे विचार डोक्यात घोळत असताना आणि बायकोला नुसतं "हं हं" उत्तर देता देता घरापाशी केव्हा पोचलो ते कळलंच नाही. एव्हाना बायकोच्या लक्षात आलं होतं कि मी कुठल्याशा विचारत मग्न आहे आणि तिने पूर्ण रस्ताभर काय बडबड केली हे मला काहीही कळलेलं नाही. दुपारच्या वेळी एक तर माझ्या मित्राकडे थांबावं लागल्याने ती वैतागलेली होती. गाडीतून उतरता उतरता तिची रागावून पुटपुट चालू झालीच होती. एरवीचा मी असतो तर मी कसा बरोबर आहे आणि तिने कसं समजून घ्यायला हवं याबद्दल तिच्याशी वाद घातला असता. पण तसं न करता गाडीत असलेलं एक चॉकलेट मी काढलं, तिच्या खांद्यावर हात टाकला, तिला थोडंसं जवळ केलं आणि "सॉरी" म्हणून तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. हातातलं चॉकलेट तिला दिलं आणि छानसं स्मितहास्य केलं. माझ्यातले बखेडाकाका आता मला सापडले होते. तुमच्यातील बखेडाकाका तुम्हांला सापडलेत का?

Friday, 7 April 2017

म्हणजे कसं असतं ना...

म्हणजे कसं असतं ना
आपला जन्म होतो
सगळे खुश असतात
आपल्याला काहीच कळत नसतं
प्रश्न एकच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
आपण मोठे होतो
शाळेत जायला लागतो
सगळ्यांना खूप उत्साह असतो
आपल्याला काहीच कळत नसतं
प्रश्न एकच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
आपण तारुण्यावस्थेत जातो
कॉलेजमधे जाऊ लागतो
सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो
आपल्याला काहीच कळत नसतं
प्रश्न एकच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
कॉलेज संपवून आपण
नोकरी किंवा व्यवसाय करू लागतो
सगळ्यांना खूप अभिमान वाटत असतो
आपल्याला काहीच कळत नसतं
प्रश्न एकच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
नोकरी करता करता
आपलं लग्न होतं, संसार सुरु होतो
सगळ्यांना अतीव आनंद झालेला असतो
आपल्याला काहीच कळत नसतं
प्रश्न एकच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
संसार करता करता
आपल्याला मुलं होतात
आपल्याला काहीच कळत नसतं तरी
सगळ्यांसोबत आपणही आनंदी असतो
तरीही प्रश्न तोच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
मुलं हळूहळू मोठी होतात
आपण ज्या जीवन चक्रातून आलो
त्यातूनच त्यांचा होणारा प्रवास पाहून सुखावतो
पण प्रश्न एकच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
अंतिम घटिका मोजताना एक दिवस
आयुष्यभर सतावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर
मिळालं असं वाटतं पण ते सांगायला जावं
तर बोलता येत नसतं,
बोलता आलं तर ऐकायला कुणी नसतं
अशा परिस्थितीत प्रश्न तोच पडतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
शेवटचा श्वास घेतल्यावर
सगळे दुःख व्यक्त करतात
सुटला सगळ्यातून एकदाचा म्हणतात
पण म्हणे आपला चिरंतन आत्मा
कुठे तरी पुन्हा ट्याहया करतो
त्या रडण्यात प्रश्न पुन्हा तोच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना...