Sunday 14 August 2022

The Toilet Hierarchy

        


कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यालयांत आणि कंपन्यांमध्ये माझं फिरणं होतं. नुकतंच असंच एका कार्यालयात जाणं झालं. ज्यांना भेटायचं होतं त्यांच्याशी छान चर्चा झाली. निघताना मला toilet वापरायचे होते म्हणून त्यांना त्याबाबत विचारले. त्यांनी "इकडून बाहेर पडून डावीकडे" असे सांगून दिशादर्शन केले. त्यांनी सांगितल्यानुसार मी तिथे गेलो. तिथे गेल्यावर मला दोन दारं दिसली. एकावर लिहिले होते "Staff" आणि दुसऱ्यावर "Director". मी काही त्या कंपनीचा Director नव्हतो म्हणून मी आपलं "Staff" अशी पाटी असलेली दार ढकललं आणि आत गेलो. 


                बाहेर आल्यावर त्यांचे वेळ दिल्याबद्दल आभार मानून तिथून निघालो. तिथून निघालो खरा पण मनात ती दोन दारं रुंजी घालत होती. अनेक प्रश्न मनात उठत होते. 


कंपनीचे मालक आणि कर्मचारी यांच्यासाठी दोन वेगळी शौचालये का असतील?


दोघंही आत जाऊन नैसर्गिक क्रियाच करतात मग हा भेदभाव का?


कंपनीचे मालक आत जाऊन काही वेगळं करतात का?


एखाद्या तरूण नवीन कर्मचाऱ्याच्या मनात अशाच गोष्टींमुळे न्यूनगंड निर्माण होत असेल का?


मालकाने अशा कर्मचाऱ्याकडून आत्मविश्वासपूर्ण कामाची अपेक्षा करावी का?


                मला जे माहिती आहे त्यानुसार नियम असं सांगतो की स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी शौचालये वेगळी असावीत. पण हे काहीतरी वेगळंच होतं. हे मी काही प्रथमतः पाहत होतो असं नव्हतं. आधीही मी बऱ्याच कार्यालयांत किंवा कारखान्यांत असा भेदभाव पाहिला आहे. इतकंच नाही तर मालकासाठी असलेले शौचालय हे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शौचालयापेक्षा अधिक स्वच्छ असतं असंही पाहिलं आहे. 


                  कर्मचाऱ्यांनी आदर करावा, आपलं ऐकावं, सांगितलेली कामं मन लावून करावीत या मालकाच्या अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण अशा छोट्या आणि साध्या गोष्टींमध्ये भेदभाव का असावा? जे कर्मचारी तुमच्यासाठी, तुमच्या कंपनीसाठी मेहनत करतात त्यांची काळजी घेणे हे मालकाचे कर्तव्य नव्हे का? जसं कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल, जबाबदऱ्यांबद्दल समजावलं जातं तसं मालकाने पण कर्मचाऱ्यांना समजावून घेऊन काम करणं अपेक्षित असतं.


                  हा भेदभाव, ही वर्तणूक कंपनीच्या भल्यासाठी आहे का याचा विचार मालकांनी नेहमीच करायला हवा. असा भेदभाव करून केवळ मालकाचा ego सुखावला जातो पण त्याचवेळी तो कर्मचाऱ्यांच्या मनावर रोज नकळत आघात करत असतो. अशी कंपनी कशी यशस्वी होणार? अशा गोष्टींमधूनच कंपनीचे culture कळते. एकीकडे आपण वाचतो की मोठमोठे उद्योगपती त्यांना महागडे तिकीट खरेदी करून विमान प्रवास करणे सहज शक्य असूनदेखील economy class ने प्रवास करतात. आणि त्याचवेळी काही मालक छोट्या छोट्या गोष्टींत भेदभाव करताना दिसतात. हा विरोधाभास मन विचलित करणारा आहे. अशाच विचारांमुळे काही कंपन्यांची वृद्धी होत नसेल का? अशा कोत्या विचारांमुळेच तो मालक कधीच मोठा होत नसेल का?


                   बऱ्याच भारतीय कंपन्यांमध्ये, कार्यालयांमध्ये आता सुधारणा होताना दिसत आहे. पण आपल्याला जी प्रगती अपेक्षित आहे ती होते आहे का हे बघणे महत्वाचे ठरेल. अशा साध्या गोष्टींमध्ये जर भेदभाव होत असेल तर आपण अजूनही मागसलेलेच आहोत असंच म्हणायला हवं. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. पण हे खरे स्वातंत्र्य आहे का? अजूनही आपण भेदभावाच्या विचारांचेच गुलाम आहोत. मला वाटतं, जेव्हा समाजातील हे विचार जेव्हा नष्ट होतील तेव्हा आपण खरा महोत्सव साजरा करण्यास पात्र ठरू. शेवटी Virgin कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या रिचर्ड ब्रँसन यांचं एकच वाक्य आठवतं "If you take care of your employees, your employees will take care of your business."


Photo by Claudio Schwarz on Unsplash

No comments:

Post a Comment