Sunday 9 May 2021

प्रतिकूल परिस्थिती आणि आशावाद

काही दिवसांपूर्वीच जेफ केलर नावाच्या एका अमेरिकन लेखक आणि वक्त्याचा एक किस्सा वाचनात आला. किस्सा तसा छोटाच आहे पण त्याने त्यातून घेतलेली शिकवण विचार करण्यासारखी नव्हे आत्मसात करण्यासारखी आहे. 

जेफला स्वतःचे शूज स्वतः चमकवायला (पॉलिश करायला) आवडायचं नाही. तो ते नेहमी बाहेरून करून घ्यायचा. जेव्हा तो फिरतीवर असे तेव्हा जिथे कुठे शूज पॉलिशची सोय असेल तिथे तो ते पॉलिश करून घ्यायचा. पण जेव्हा तो त्याच्या राहत्या गावी असे तेव्हा मात्र त्याला त्याच्या घरापासून दूर जवळपास १२ मैलावर असलेल्या एका मॉलमध्ये जावं लागायचं. तिथे एक दुकान होतं जिथे पॉलिशिंगची सोय होती. मग तो त्या दुकानात काही गोष्टी खरेदी करत असे आणि तिथे असलेल्या पॉलिश स्टँडवर शूज चमकवून घेत असे. घरापासून हे असं दूर जावं लागत असल्याने तो जाताना बरेच जोड घेवून जात असे. 

सहसा ते दुकान सकाळी १०.३० ला उघडत असे. एक दिवस तो असाच पावणेअकराच्या सुमारास तिथे पोहोचला. दुकान उघडलेलं होतं पण शूज पॉलिश स्टँड अजून बंदच होता. त्याने तिथे काम करणार्‍या एकाला ते स्टँड कधी सुरू होईल हे विचारलं. त्या माणसाने जेफला १० मिनिटं थांबायला सांगितलं. १० मिनिटं होवून गेली तरी तिथे कोणीच आलं नाही हे पाहून त्याने पुन्हा विचारणा केली. त्या माणसाने त्याला सांगितलं की अगदी मिनिटभरातच ते स्टँड सुरू होईल. १०-१५ मिनिटं झाली तरी ते स्टँड सुरू व्हायची काही चिन्हं दिसेनात. मग सरळ तो त्या दुकानाच्या मॅनेजरकडे गेला आणि चौकशी केली. मॅनेजर म्हणाला, "माफ करा तुमची गैरसोय झाली पण आज त्या स्टँडवरचा माणूस सुट्टीवर आहे." असं म्हणून तो निघून गेला. 

आता मात्र जेफ वैतागला. त्या क्षणी त्याच्या डोक्यात विचार आला कि या सगळ्यांची तक्रार नोंदवावी, अगदी कोर्टात केस करावी. पण स्वतःला सावरलं आणि तिथून निघाला. घरच्या जवळ पोहोचत असताना त्याला सुचलं कि वाटेत असलेल्या एका शूजच्या दुकानात चौकशी करावी. कुणी सांगावं कदाचित शूज पॉलिश करून मिळतीलही. दुकानात जावून चौकशी केल्यावर त्याला कळलं कि त्या दुकानात पॉलिशिंगची सोय नाही पण तिथून पुढे काही अंतरावर एक दुकान आहे जिथे त्याचं काम होवू शकेल. 

मग त्याने तिथे जायचं ठरवलं. तिथे जावून बघतो तर काय, "५ मिनिटांत परत येतो आहे" अशी पाटी दुकानावर लावलेली! आता मात्र त्याचा धीर सुटत चालला होता. पण तरीही त्याने थांबायचं ठरवलं. तब्बल १० मिनिटांनी त्या दुकानातला माणूस आला. जेफने त्याला काय हवे आहे ते सांगितलं. त्या माणसाने जेफला शूज ठेवून जा आणि एक  तासाभराने या असं सांगितलं. 

एक तासाने जेव्हा जेफ तिथे गेला तेव्हा त्याला जाणवलं कि त्याचे शूज नुसते चमकतच नव्हते तर चांगले झळाळत होते! त्याने दाखवलेल्या धीराचे फळ त्याला मिळाले होते. 

दुसरा एक प्रसंग वाचनात आला तो आहे हार्वर्ड विद्यापीठातला. प्रसंग नव्हे तो एक प्रयोगच होता. डॉ. कर्ट रिष्टर या शास्त्रज्ञाने काही उंदरांवर १९५० च्या दशकात एक प्रयोग केला होता. त्याने काय केलं तर उंदरांना पाण्याच्या एका कृत्रिम तळ्यात सोडलं. त्याला हे अभ्यासायचं होतं कि ते उंदीर पाण्यात किती वेळ तग धरू शकतात. त्याच्या असं लक्षात आलं कि जिवंत राहण्यासाठी साधारणतः ते १५ मिनिटं प्रयत्न करतात. प्रयोग करताना उंदीर जेव्हा थकून जावून प्रयत्न करणं सोडायचे तेव्हा शास्त्रज्ञ त्यांना उचलायचे, त्यांचे अंग कोरडे करायचे, त्यांना थोडा वेळ विश्रांती घेऊ द्यायचे आणि पुन्हा पाण्यात सोडायचे. 

या दुसर्‍या फेरीत ते उंदीर किती वेळ तग धरून राहिले असतील असं तुम्हाला वाटतं? पुन्हा १५ मिनिटं? १० मिनिटं? ५ मिनिटं? विश्वास बसणार नाही पण तब्बल ६० तास! हो, हो, बरोबर वाचलंत...६० तास! शास्त्रज्ञांनी या प्रयोगातून असा निष्कर्ष काढला कि आपली यातून सुटका होईल केवळ या विश्वासामुळे त्या उंदरांनी केवळ अशक्य वाटणारे असे जलतरण केले. निव्वळ सकारात्मक आशा बाळगून जर उंदीर इतक्या वेळ पोहू शकतात तर तोच सकारात्मक आशावाद आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना कुठल्याही कठीण परिस्थितीतून नक्कीच तारून नेऊ शकेल. स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतांवर दृढ विश्वास ठेवला तर कुठलेच संकट माणसासाठी मोठे नाही. 

जेफच्या आयुष्यातील छोटासा प्रसंग असो किंवा उंदरांवरचा प्रयोग असो, एक गोष्ट नक्की कळते कि प्रतिकूल परिस्थिती ही कायम राहू शकत नाही. आपण योग्य ती सकारात्मक वृत्ती आणि आशावाद बाळगला तर कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो. त्या जाहिरातीतील वाक्य आठवतं? "डर के आगे जीत है". कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीची सकारात्मक बाजू असतेच. सध्याचा काळ बर्‍याच जणांसाठी प्रतिकूल आहे पण त्यांनी तो तसा वाटू दिला तर. नेपोलियन हिल या प्रसिद्ध लेखकाचं एक वाक्य या क्षणाला आठवतं "कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत तिच्याएवढ्याच किंवा तिच्याहूनही अधिक अनुकूल परिस्थितीची बीजं असतात".