Tuesday 17 October 2017

निसर्गातील प्रेम

शांत रात्री सूर्यही निजलेला, थंडी गुलाबी धुंदशी हवा,
धरणीला भेटण्या उतरला, शुभ्र ढगांचा थवा

प्रातः समयी चालू असता प्रेम कूजन दोघांचे,
जागलेल्या सूर्यास कुठे दिसेना अस्तित्व ढगांचे

सहज बघावे म्हणूनी, शोधण्या ढगांना धाडली किरणे
पोचली ती धरतीवरी, जणू कळपातील धावती हरणे

पाहून किरणांना ढगांची झाली पळता भुई थोडी
विलग झाली गुंतलेली युगुलाची जोडी

जागी झाली धरणी आनंद झाल्याचे भासवे
पण पानांवरती दिसती ढगांची दवरुपी आसवे

सरली थंडी झाला सुरू कडक उन्हाळा
ढग शुष्कसे झाले पाहून ग्रीष्मातील ज्वाळा

सूर्याची दाहक ती आग, भेगा पडती धरणीला
देई ती अग्निपरीक्षा, येणार ढग हे ठाऊक तिजला

तृषार्त जाहली धरणी, नजर लावूनी गगनाकडे
मग्न किती तो सूर्य, लक्ष नसे त्याचे दबकत येणाऱ्या ढगांकडे

पाहूनी प्रिय धरणीचे ते हाल, वाहू लागती ढगांच्या अश्रुधारा
झाकोळूनी सूर्याला, उतरवती त्याचा पारा

पाहुनी विद्युलता अन ऐकुनी गडगडाट ,
सूर्य लपतसे कुठल्याशा कोनाडयात

प्रेमी युगुलाच्या पुनर्मिलनाने होतसे दंग,
आनंदूनी मग स्वतःच उधळे इंद्रधनुचे रंग

निसर्गातील हि किमया जणू वाटे चमत्कार
कि प्रेमाची महती शिकवी तो किमयागार?