Wednesday 29 March 2017

रामाचा पाडवा

          रामभाऊ त्यादिवशी नेहमीपेक्षा जरा लवकरच उठला. साहेबांनी आदल्या दिवशी आज लवकर कामावर रुजू होण्याची जी सूचना दिली होती त्याने खरंतर त्याला झोप अशी लागलीच नव्हती. उगाचच या कुशीवरून त्या कुशीवर वळत त्याने कशीबशी रात्र काढली होती. आजचा दिवसही तसा खासच होता, गुढी पाडव्याचा. मराठी नवीन वर्षाची सुरूवात, शुभमुहुर्त, पण रामभाऊसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राहकांची त्यांच्या गाड्या घेण्यासाठी होणारी गर्दी आणि त्यांना द्यावी लागणारी सेवा. रामभाऊ गाड्यांच्या शोरूम मध्ये वॉचमन होता.


          आन्हिकं उरकून त्यानं बायकोला चहा आणि न्याहारी द्यायला सांगितलं. ते सांगताना उगाचंच त्याच्या डोक्यात तिला पाडव्याला दागिना करून देण्याचं त्याने दिलेलं वचन आठवलं आणि त्याला अपराध्यासारखं वाटून गेलं कारण ते त्याला काही जमणार नव्हतं. त्याची बायको तशी समजूतदार होती. तिनंही नवऱ्याची लगबग पाहून तो विषय काढायचं टाळलं. चहा न्याहारी करताना त्याचा पाच वर्षांचा पोरगा डोळे किलकिले करून उठला आणि लाडात येऊन त्याच्या मांडीवर डोकं ठेवून निजला. त्याला ठाऊक होतं कि आपले वडील आता पूर्ण दिवसभर काही आपल्याला दिसणार नाहीत. रामभाऊनं त्याच्या केसांतून हात फिरवला आणि कपाळाचं चुंबन घेतलं. त्याच्या बायकोनं लुगड्याच्या झोक्यात निजलेल्या बाळाला झोका देत बापलेकाचं प्रेम कौतुकाने डोळे भरून पाहिलं. चहा न्याहारी संपवून, पोराला पुन्हा निजवून आणि युनिफॉर्म घालून रामभाऊ निघाला. "रात्री येतो" असं बायकोला सांगून त्यानं सायकल काढली. गुढी कधी उभारायची, आज गोडाचं काही करायचं का, पोरांना आज काय घ्यायचं हे सगळे प्रश्न त्याच्या बायकोने गिळून "बरं, या लवकर. वाट पाहते" एवढंच म्हणलं आणि खोलीत गेली.


          रामभाऊच्या कानावर बहुदा ते शब्द पडलेही नसावेत. त्याने सायकल हाकायला सुरूवात केली. रस्त्याने जाताना घराघरांत चाललेली सणावाराची लगबग त्याला दिसत होती. कुणी गुढी उभारत होतं तर कुणाच्या घरातून पक्वान्न बनत असल्याचं येणाऱ्या सुगंधावरून कळत होतं. त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत रामभाऊ सायकल चालवत होता. मधेच नजरेसमोरून बायकोचा आणि पोरांचे चेहरे येऊन जायचे पण त्याला सायकल हाकण्याशिवाय पर्याय नव्हता. वर्षातील सगळे दिवस त्याला सारखेच. वर्षाचा पहिला दिवस असो नाहीतर शेवटचा त्याचा दिनक्रम तोच.


          रामभाऊ शोरूमवर पोचला. रात्रपाळीच्या वॉचमनला अलविदा करून तो कामाला लागला. त्याच्या गेटवरच्या छोट्याशा खोलीत असलेल्या देवांच्या फोटोंना नमस्कार करून तो पूर्ण शोरूमचा फेरफटका मारायला निघाला.  पाडव्याच्या मुहूर्तासाठी शोरूम छान सजवली होती. त्यातली काही सजावट करायला तर त्यानेच काल मदत केली होती. छोटी छोटी काही कामं अजून बाकी होती पण ती वेळेत पूर्ण होण्यासारखी होती. फेर फटका झाल्यावर तो गेटवरच्या खोलीत जाऊन बसला. त्याला बरं वाटलं.


          आता हळूहळू एकेक कर्मचारीदेखील यायला लागले होते. प्रत्येकाची एंट्री गेट वरच्या वहीतच होत असे. कोण किती वाजता येतं आहे यावर राम भाऊ लक्ष ठेवून असे. जवळ जवळ आता सगळे जण आले होते. ऑफिस मधला तसेच वर्क शॉप मधला रोजचा आवाज येऊ लागला. आता हळू हळू ग्राहक यायलाही सुरूवात होईल याची सर्वांना जाणीव होती. तेवढ्यात साहेबांनी रामभाऊला केबिन मधे बोलावून घेऊन दिवसभरात काय कामं अपेक्षित आहेत ते सांगितलं. ते सगळं समजून घेऊन तो त्याच्या खोलीत येऊन बसला.


          गाडी घ्यायला पहिला ग्राहक आला. पूर्ण कुटुंबच आलं होतं. नवरा, बायको आणि त्यांची दोन मुलं. "नमस्ते सर, नमस्ते मॅडम" साहेबांनी बजावल्याप्रमाणे रामभाऊने त्यांचं स्वागत केलं. त्यांनी त्याच्याकडे न पाहताच रिसेप्शन गाठलं. त्याला याची सवय होतीच कारण रोजच असे कितीतरी लोक यायचे आणि त्याची दखल न घेता अथवा त्याकडे 'काय कटकट आहे, हा कोण आम्हाला अडवणारा' अशा भावनेने बघायचे. पण आज सणाचा दिवस होता त्यामुळे निदान आजतरी आपल्या नमस्काराला योग्य प्रत्युत्तर मिळावे हि त्याची माफक अपेक्षा होती. पण त्याच्या अपेक्षांची कदर कोण करतो. लाखो रुपये खर्च करून गाड्या घेणारे एका साध्या वॉचमनकडे  ते काय पाहणार. उलट त्याने सलाम ठोकावा हिच त्यांची अपेक्षा. रामभाऊला इतक्या वर्षांच्या नोकरीमुळे हे आता सवयीचे झाले होते. एखादा कोणी कधी जर नमस्कार करत असे तर त्याचा आनंद त्याला दिवसभर कामाची ऊर्जा देत असे.


          एकेक करत बरेच ग्राहक आता आले होते. कोणी गाडी न्यायला तर कोणी बघायला आले होते. गाडी न्यायला आलेल्या एका ग्राहकाने जाताना दोन पेढे राम भाऊच्या हातात ठेवले. "अभिनंदन सर" असं तो मनापासून त्या साहेबांना म्हणाला. त्याने ते पेढे जपून ठेवले. मनाशी विचार केला घरी गेल्यावर पोरांना देता येतील. काम करता करता लंच टाईम केव्हा झाला ते कळलंच नाही. आज गर्दी जास्त असल्याने सगळे जण काम सांभाळून वेळ मिळेल तसं जेवायला जात होते. थोडासा रिकामा वेळ मिळाला तेव्हा राम भाऊच्या लक्षात आलं कि सकाळी गडबडीत डबा आणायला विसरला. पण पोटातल्या कावळ्यांना काव काव करू द्यायची नाही हे त्याने ठरवलं. बाटलीभर पाणी पिऊन गप्प बसला. साथीदाराने जेवणाबद्दल विचारता म्हणाला "आज तब्बेत जरा नरमच आहे, तु घे जेऊन". सणाच्या दिवशी असा उपवास घडल्याने थोडासा तो नाराजच झाला.


          दुपारी एका ग्राहकाने जाताजाता एक गाठी राम भाऊला दिली. दिवसभर अशी प्रचंड धावपळ,  गडबड चालू होती. लोकांचे हसरे चेहरे बघून राम भाऊ खुश होता. त्याला भुकेचा आणि बायकोचा व पोरांचा पुरता विसर पडला होता. संध्याकाळी खूप उशिरापर्यंत काम चाललं होतं. शेवटी आठ सव्वा आठच्या सुमारास रात्रपाळीचा वॉचमन आल्यावर राम भाऊला वेळेची जाणीव झाली. निघताना का कोण जाणे त्याला तिथे पडलेला एक हार आणि फुलं घ्यावीशी वाटली. ती त्याने उचलून पिशवीत भरली व घराकडे निघाला.


          परत येताना सगळीकडे आनंदोत्सव साजरा होत असल्यासारखे त्याला वाटले. घरी पोचेपर्यंत त्याला नऊ सव्वा नऊ झाले होते. पोरं निजायलाच लागली होती. वडील आलेले पाहून उठून बसली. मोठा मुलगा राम भाऊला जाऊन बिलगला. "दिवसभर कुठं होतात? माझ्यासाठी काय आणलं?" हे प्रश्न त्याच्या डोळ्यांत होते. रामभाऊनं त्याला कडेवर घेऊन त्याचा एक मुका घेतला आणि झोळीतल्या बाळाकडे गेला. तिच्या चिमुकल्या हातात त्याने ती गाठी ठेवली. ते बाळ त्याला माळ समजून त्याच्याशी खेळू लागलं. राम भाऊनं तिच्याकडे डोळे भरून पाहिलं. बायकोकडे वळून म्हणाला "वाढ लवकर, भूक लागली". ती म्हणाली, "चला तयार आहे सगळं. मला माहिती आहे आज उपवास घडला आहे ते." तिच्या समजूतदारपणाने तो सुखावला. जेवता जेवता त्यानं तिला विचारलं, "काय केलंस दिवसभर?" तिनं पूर्ण दिवसाचा अहवाल वाचून दाखवला. त्यातून त्याला हे उमगलं कि त्याला घडलेल्या उपवासामुळे तिनंही एक घासही दिवसभरात खाल्ला नव्हता. गुढी उभारायची पूर्ण तयारी तिनं केली होती, एक काठी, जुन्या पातळाचा तुकडा आणि इतर छोटी सामग्री गोळा केली होती. नवरा संध्याकाळी आला कि गुढी उभारावी असं तिनं ठरवलं होतं.


          ते ऐकून तो गहिवरला. त्याला काय बोलावं ते सुचेना. तिला म्हणाला, "घे तू पण माझ्यासोबत जेवायला." ती नको म्हणत होती पण त्याने ती जेवल्याशिवाय तो जेवणार नाही अशी अट घातली मग तिलाही जेवण करणं भाग पडलं. जेवणं झाल्यावर तिने झोपायची तयारी सुरु केली. तोच तिला कोणीतरी काहीतरी खणत असल्याचा आवाज आला. तिने बाहेर येऊन बघितलं तर तिला दिसलं रामभाऊ गुढी उभारायची तयारी करत होता.

ती म्हणाली, "काय करताय?"

"गुढी उभारू की"

"आत्ता?"

"तर काय, अजून नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे. तू तयारी एवढी केलीस मग ती काय वाया जाऊ द्यायची?"

"अहो पण काही वेळ काळ?"

"अगं आपल्याला कोण विचारतंय? आपलं नवीन वर्ष आपण ठरवू तेव्हाच सुरू होतं. जगाच्या नवीन वर्षाशी आपल्याला काय देणं घेणं.आपण जी ठरवू तीच वेळ"

          तिला नवऱ्याची गंमत वाटली आणि कौतुकही. मग तीही सरसावली आणि तिनं बाकीची तयारी केली. त्यानं आणलेला हार आणि फुलं घेतली आणि त्यांनी गुढी उभारली. त्याने त्याच्याजवळचे सकाळी मिळालेले दोन पेढे काढले. ते दोघांनीही एकमेकांना भरवले आणि दोघंही खुदकन हसले.


          दिवसभराच्या श्रमाने शिणलेलं त्याचं शरीर पहुडलं. डोळे मिटताना त्याला बाळ निवांत निजलेलं दिसलं. त्याच्या चिमुकल्या मुठीत त्याने मघाशी दिलेली गाठी तशीच होती. बाहेर उभारलेल्या गुढीला बांधलेला पातळाचा तुकडा वाऱ्याने फडफडत होता, फुलांचा सुवास दरवळत होता आणि दुरून कुठुनतरी भजनाचे सूर कानावर येत होते "जय जय राम कृष्ण हरी".

Tuesday 21 March 2017

चलो थोड़ासा जी लेते हैं

चलो थोड़ासा जी लेते हैं,
मधुर रस जीवन का पी लेते हैं।
थोड़ा थमकर, थोड़ा रुककर
जिंदगी कि छोटी खुशीया बटोरकर
उसे महसूस करते हैं।

सुंदर घोंसला चिड़िया जो बनायें
देखकर उसे दिल खुश हो जाये
कभी हसके खिलखिलाती गुड़िया के साथ
कभी प्यार से थामकर बुढे माँ बाप का हाथ
चलो थोड़ासा जी लेते हैं।

नन्हासा पौधा जीना चाहे 
गलते नल का पानी पी कर
चलो उसकी इर्द गिर्द फ़ैली मिट्टी को सवार कर
उसके बढ़ने कि उम्मीद रखते हैं
चलो थोड़ासा जी लेते हैं।

बचे हुए मैदानों में बच्चे खेलतें हैं
कभी उन मैदानों कि पुकार सुनकर
बच्चों के साथ बच्चा होकर
कुछ खेल खेलते हैं
चलो थोड़ासा जी लेते हैं।

पूनम कि रात सर उठाकर
चलो देखें चाँद का रूप सुंदर
अमावस कि रात झिलमिलाती चाँदनिया देखकर
रविवार को उगते सूरज के लाल रंग में घुलकर
चलो थोड़ासा जी लेते हैं।

शहर में छोटासा चुलबुलाता नहर
दौड़ता हैं इधर से उधर
कभी उसके पास रुककर
बहता हुआ संगीत सुन लेते हैं
चलो थोड़ासा जी लेते हैं।

अंतिम स्थान तो सबका निश्चित हैं
वहा उपरवाला एकही सवाल पूँछता हैं
"कैसी थी जिंदगी?"
तब तो सोच में नहीं पड़ना हैं
चलो इस सवाल का जवाब ढूँढ़ते हैं
चलो थोड़ासा जी लेते हैं।