Sunday 20 October 2013

माझी 'जिम'मे वारी


माझी 'जिम'मे वारी  


          एका शनिवारी दुपारचे भरपेट जेवण झाल्यावर टि. व्ही. वर चालू असलेला अर्नोल्डचा (या माणसाच्या नावाची जेव्हापासून ओळख झाली तेव्हापासून फक्त त्याचे प्रथम नावच उच्चारतो कारण त्याचे आडनाव उच्चारायचे अजूनही धाडस होत नाही. कॉलेजमध्ये असताना आम्ही सोयीस्करपणे ते 'शिवाजीनगर' असे उच्चारत असू) 'Termintaor' पाहिला. त्याची त्यातली हाणामारीची दृष्यं तर तोंडात बोटं घालायला लावणारी तर होतीच पण त्याच्या भारदस्त शरीरयष्टीने डोक्यात घर केले. संध्याकाळी फिरायला म्हणून बाहेर पडलो पण अर्नोल्डची शरीरयष्टी काही डोक्यातून बाहेर पडेना. झालं, मग ठरवलं कि जिमला जाणं चालू करायचं. माझ्या फिरायच्या वाटेवर एक जिम आहे हे मला आठवलं आणि ठरवलं कि तिथे जाऊन चौकशी करायची. इतरवेळी माझी पावलं हि जिमच्या  विरुद्ध दिशेने पडत असत पण आज वेगळीच ऊर्जा संचारली होती. रिसेप्शनमधल्या बाईंनी थोडसं स्मित करत स्वागत केलं. त्यांच्या डोळ्यांत मला "आले अजून एक आरंभशूर!" अशी भावना उगाचच तरळताना दिसली. पण त्यांना काय माहित आज मी ठाम निश्चय करून आलो होतो ते. मी म्हणालो "मला जिम जॉईन करायची आहे". त्यावर त्या उत्तरल्या "बसा. मी तुम्हाला माहिती देते". असं म्हणून त्यांनी त्या जिमची माहिती पुढची १० मिनीटे सांगितली. मग त्या म्हणाल्या "चला मी तुम्हाला जिम दाखवते". मीही मोठया उत्साहात त्यांच्या मागे जिमची सैर करायला निघालो. आतमध्ये सगळेच पैलवान होते. काही अशक्त तर काही प्रशस्त, काही नवखे तर काही सरावलेले, काही वजनं लीलया उचलत होते तर काही वजनांकडे बघून धापा टाकत होते. तिथली विविध उपकरणे आणि मोठया आवाजातलं संगीत चक्रावून सोडणारं  होतं. बाईंनी मग तिथल्या सरांची ओळख करून दिली आणि म्हणाल्या "हे तुमचं वजन कमी करून देतील, चिंता करू नका". मी पण हस्तांदोलन केलं आणि हसलो.

          सैरसपाटा संपल्यावर मग परत ऑफिसमधे आलो. बाईंनी विचारलं "तुम्ही कुठलं package घेणार?" मी गोंधळलो पण माझे अज्ञान उघडे पडू नये म्हणून सावरत म्हणालो "काय ऑप्शन्स आहेत?" मग बाईंनी ४ - ५ पर्याय सांगितले. मी आपलं खूपच इंटरेस्ट घेऊन ऐकतो आहे असं भासवलं पण त्या 'मुख्य' मुद्द्याकडे कधी येतात याची वाट बघत होतो. हॉटेलमधल्या मेनू कार्डची उजवी बाजू आधी बघणारा मी अर्थातच त्या फी किती सांगतात याबाबत उत्सुक होतो. शेवटी बराच वेळ चर्चा केल्यानंतर असं ठरलं कि मी "जिम + कार्डिओ" हा पर्याय निवडावा. त्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर आणि प्रवेशाची इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बाई म्हणाल्या "आता सोमवारपासून या. ऑल दि बेस्ट"! मीही मोठया आनंदाने बाहेर पडलो. उगाचच पोट आत घेऊन आणि छाती बाहेर काढून चालू लागलो.

          रविवारचा दिवस अर्थातच तयारीचा होता. आता जिमला जायचे म्हणजे कपडे, बूट वगैरे घेणं आलं. मग बायकोबरोबर बाजारात गेलो. ४ - ५ दुकानं पालथी घातल्यावर पाहीजे तसे आणि मुख्य म्हणजे मापाचे कपडे मिळाले. फारच दमछाक झाली होती. वैतागलेल्या बायकोला म्हणालो "आता जिमला जाणार आहे ना, बघ कसा स्टामीना वाढतो ते". "घाम पूस आधी" ती त्रासलेल्या स्वरात म्हणाली "आणि आता काहीतरी खायला - प्यायला घाल मला. खूप फिरवलंस, तुझ्याआधी माझीच जिम सुरू झाली आहे ". निमूटपणे आमची स्वारी हॉटेलकडे वळली. उद्यापासून जिमला जायचेच आहे या विचाराने एक रोटी जरा जास्तच खाल्ली गेली.

          कधी नव्हे ते सोमवारी लवकर उठलो. प्रातर्विधी उरकून जिमला पोचलो. बहुधा त्या दिवशी मीच पहिला होतो. जिमचे सर आले आणि म्हणाले "गुड मॉर्निंग! चला सुरू करू या". मीही उत्साहात म्हणालो "सांगा कशाने सुरुवात करायची "? ते म्हणाले "आधी वॉर्म अप". मी प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मग त्यांनी १ - २ व्यायामाचे प्रकार करून दाखवले. मला शाळेतल्या P. T. ची आठवण झाली. १० - १५ मिनीटांच्या या व्यायाम प्रकारानंतर तहानच लागली. अर्धा बाटली पाणी प्यायलो. सर म्हणाले "आज कार्डिओ करू यात". मी निमूटपणे मान डोलावली. ते एकाच जागेवर राहणाऱ्या सायकल पाशी थांबले. त्यांनी त्याच्या डिस्प्लेवर काही बटणं दाबली आणि म्हणाले "चालू करा". मी स्थानापन्न झालो. समोरच ASh चा फोटो हसऱ्या चेहेऱ्याचा (इथे ASh म्हणजे ती सौंदर्यवती नव्हे तर Arnold ShXXXXXXXgar ची ती आद्याक्षरे आहेत). मी पेडल मारायला सुरूवात केली पण ते एकाच जागी ढिम्म! मी सरांकडे पाहिलं आणि निरर्थक हसलो. तेही मान "नाही" म्हणताना हलवतो तशी हलवत आले आणि हसत हसत त्यांनी "टेन्शन" सर्वांत low ठेवलं. मग मी सायकलिंग सुरू केलं. मला लहानपणी सायकलीवर धार लावून देणारा माणूसच आठवला एकदम. सुरुवातीचे २ मिनीटे काही वाटलं नाही पण नंतर घशाला कोरड पडायला लागली. मी डिस्प्लेवर पाहिलं तर १० मिनिटांची वेळ सेट केलेली होती. ते बघूनच घाम आला. हळू हळू वेग मंदावत गेला. मधेच सर आले कि वेग वाढत असे. असं करत करत कशी बशी १० मिनिटे संपली. पुन्हा पाव बाटली पाणी प्यायलो.

          पुढचा प्रकार होता Treadmill आणि नंतर Climber. इथेही पुन्हा तसंच. एकाच जागी न पडता चालत रहायचं. मला आश्चर्य वाटलं असे कसे हे व्यायामाचे प्रकार! मनात विचार आला हे तर अगदी आपल्या नोकरीसारखंच म्हणजे कितीही मेहेनत घेतली तरी एकाच जागी! ट्रेडमिलच्या पट्ट्यावर उभं राहता राहता नाकी नऊ आले. दोनदा तर पडता पडता वाचलो नाहीतर पहिल्याच दिवशी कपाळमोक्ष झाला असता आणि दंतपंक्ती विस्कळीत झाली असते ते वेगळेच. दोन्ही व्यायाम प्रकार झाल्यावर उरलंसुरलेलं पाणी पण पिऊन टाकलं आणि एक मोकळी जागा बघून बसलो. तेवढयात सर आले आणि म्हणाले "काय दमलात इतक्यात? अजून तर abs करायचेत". ते ऐकून तर माझ्या पोटातच गोळा आला.

          मग पुढची १५ मिनीटे पोटावर ताण पडणारे असे काही व्यायाम प्रकार झाले कि काही सांगता सोय नाही. जास्तीची खाल्लेली एक रोटी चांगलीच भोवली. मग शेवटी शवासन केलं. ते मात्र अगदी मन लावून आणि २ मिनीटे जास्तच केलं. शरीरातील स्नायू शिथील व्हावेत म्हणून. "आता जायच्या आधी वजन करू या" सर म्हणाले. मी मोठया आनंदाने वजन काट्यावर उभा राहिलो. बघितलं तर काय आश्चर्य! १०० ग्रॅम वजन जास्तच दाखवत होता तो मेला वजनकाटा. मी उगाच सारवासारव करीत म्हणालो "कपड्यांचाही वजन असतं ना. शिवाय आमच्या घरी सगळेच डबल हड्डीचे आहेत. पण मला खात्री आहे वजन कमी होईल याची ". असं म्हणून तिथून निघालो.

          दुसरा दिवस होता तो जिमचा म्हणजे उपकरणे वापरण्याचा, वजनं उचलण्याचा. आदल्या दिवशीच्या व्यायामाने शरीर आखडलेले होते आणि दुखतही होते. पण आज खरीखुरी जिम करायची म्हणून थोडा उत्साह टिकून होता. वॉर्म अप झाल्यावर एक एक प्रकार वजनं उचलण्याचे आणि जोर लावण्याचे सुरु झाले. दुसरा दिवसही मग पार पडला. आता एक दिवस सोडून पुन्हा तेच प्रकार करायचे असे वेळापत्रक होते. सहाव्या दिवशी मग नेहेमीपेक्षा जास्तीची वजनं लावून व्यायाम करायचा ठरवलं. १ - २ असे प्रकार केल्यावर सरांना म्हणालो "आज नेहेमीपेक्षा १० किलो जास्त वजन लावून व्यायाम करतोय". सर शांतपणे म्हणाले "अहो हि वजनं पौंडात आहेत". ते ऐकताच आलेला उत्साह पौंड - किलोच्या गुणोत्तराच्या प्रमाणातच कमी झाला आणि मी पुढच्या व्यायाम प्रकाराकडे वळलो.

          शेवटचा १ व्यायाम प्रकार करता करता विचार आला कि आज एक पूर्ण आठवडा मी जिम केलं आहे. विचार खूपच सुखावणारा होता कारण मागचा इतिहास बघता हे पहिल्यांदाच घडत होतं. या आनंदात असतानाच धाण असा वजनं पडल्याचा आवाज झाला आणि त्याचबरोबर काहीतरी मोडल्याचाही आवाज आला. मला कळलं कि पहिला आवाज वजनं आपटल्याचा होता पण दुसरा आवाज कसला हे बघण्यासाठी म्हणून उठायला गेलो तर उठता येईना. मग लक्षात आलं कि दुसरा आवाज हा वेगळा कसला नसून माझेच कुठले तरी हाड मोडल्याचा आहे. मी कळवळलो. तेवढयात सर आणि इतर मंडळी धावत आली. नेमकं त्याचवेळी "ऑल इज वेल" गाणं चालू असल्याचं मला ऐकू येत होतं.

          जिममधून सरळ मला हॉस्पिटलात नेलं. तिथं डॉक्टरांनी तपासून सांगितलं कि फारसं चिंता करण्यासारखं काही नाही पण १० दिवस तरी काही विशेष हालचाल करता येणार नाही. बेड रेस्ट घेतलीत तर उत्तम असा म्हणाले. मी पडल्या पडल्या विचार केला पंढरपूरची वारी जशी १८ दिवसांची असते तशीच माझी हि 'जिम'मे वारी झाली. पहिले ८ दिवस जिमचे आणि नंतरचे १० दिवस हॉस्पिटलचे. असं म्हणतात माणसाचं शरीर हे मंदिरासारखं असतं. मी या वारीनंतर 'जीम्मेवारीने' ठरवलं कि या माझ्या मंदिराची पुन्हा काही पडझड किंवा तोडफोड होइल असं काही करायचं नाही.

          मी थोडयाच दिवसांत नॉर्मल झालो. असंच एका शनिवारी बायकोने विचारलं  'भाग मिल्खा भाग' ला जाऊ या? मी आवंढा गिळला आणि म्हणलो "बघू विचार करून सांगतो".