Sunday 22 March 2020

गुळ तूप पोळी आणि मी

गुळ तूप पोळी आणि माझं नातं अगदी लहानपणापासूनचं. जणू ती माझी बालमैत्रीणच. शाळेतल्या डब्यात आईने द्यायला सुरूवात केली आणि तिने माझ्या आयुष्यात अढळस्थानच प्राप्त केलं. आजही इतक्या वर्षांनी जेव्हा मी गुळ तूप पोळी खातो तेव्हा एक असीम आनंद मिळतो. मला खात्री आहे की आपल्यापैकी कित्येक जणांना ती अशीच मनापासून आवडत असेल.

बघायला गेलं तर किती साधा पदार्थ. अगदी कमीत कमी जिन्नस वापरून तयार करता येईल असा. म्हणजे पदार्थाच्या नावातच त्याचे जिन्नस, गुळ, तूप आणि पोळी. त्यातदेखील शिळी पोळी असेल तर ती अजूनच चवीष्ट लागते. या तीनच गोष्टी वापरून एक कंटाळा न येणारा, पोट भरू शकणारा, समाधान देणारा आणि हो आजकाल ज्याचं फार महत्त्व आहे असा पौष्टिक पदार्थ म्हणजे गुळ तूप पोळी. ज्याने किंवा जिने या पदार्थाचा शोध लावला असेल त्याचा/तिचा मी सदैव ॠणी आहे.

मी हे मान्य करतो कि मी मधुरदंती आहे. गोड खाणारा, गोड्या, गोडोबा ही मराठीतील विशेषणं न वापरता "I have a sweet tooth" याचं गोड भाषांतर करून मराठी भाषा किती गोड आहे हे सांगण्याचा हा एक प्रयत्न. असो. तर थोडक्यात काय तर मला गोड पदार्थ आवडतात. गुळ तूप पोळी आणि पारले जी ची बिस्कीटं हे माझे बालपणापासूनचे सवंगडी. त्यापैकी आधी कोणाशी मैत्री झाली हे सांगणं कठीण आहे. पण गुळ तूप पोळी अजूनही माझ्या टचमधे आहे. खरं तर पारले जी बिस्किटांवरही माझं प्रेम आहेच पण बायकोला माझी आणि त्यांची मैत्री फारशी आवडत नाही. ती हेल्थ कॉंशस वगैरे असल्यामुळे आणि मीही आहाराकडे लक्ष द्यावं असा तिचा आग्रह असल्यामुळे मी त्यांच्याशी जरा कमीच संबंध ठेवून असतो. तो माझा सवंगडी परदेशी गेला आहे असं मी समजतो. आता मी तथाकथित पौष्टिक आणि अगोड (शुगर फ्री) बिस्किटांमध्ये आमची मैत्री शोधतो. पण ते कसं आहे ना काहीजणांची मैत्री मूल्यवर्धक नसते पण तरीही हवीहवीशी वाटते तसच काहीसं माझं आणि पारले जी बिस्किटांचं झालं आहे.

तर मी गुळ तूप पोळीबद्दल सांगत होतो. ती करता आणि खातादेखील किती वेगवेगळ्या पद्धतीने येते. पोळीवर तूप पसरवून त्यावर गुळ कुसकरून मग पोळीची गुंडाळी करायची आणि एकेक घास चवीने खायचा, ताटात गुळ आणि तूप कालवायचं आणि पोळीच्या एकेका तुकड्यासोबत थोडं थोडं लावून खायचं. किंवा गुळपोळी आणि तूप. पण माझा आवडता प्रकार म्हणजे पोळी आणि गुळ बारीक कुसकरून त्यावर तूप घालून एकत्र कालवून खायची. छान मऊ लुसलुशीत असा तो पदार्थ स्वर्गीय सुख देतो. यात गुळाचं प्रमाण आणि कुसकरलेल्या पोळीचे तुकडे योग्य आकाराचे असतील तर त्या पोळीची मजाच न्यारी. याच मिश्रणाचा लाडूदेखील कधी कधी डब्यात असायचा. कदाचित सकाळच्या गडबडीत उपलब्ध असलेला वेळ पदार्थाचे स्वरूप ठरवत असावा. वेळ असेल तर लाडू नाही तर नुसतीच कालवलेली पोळी. किंवा मूड चांगला असेल तर लाडू नाही तर घरात भांडण झालं असेल तर कुसकरलेली पोळी. पण रागावून कुसकरलेली पोळी अधिक बारीक आणि गुळ आणि तुपात एकरूप होऊन गेलेली असायची हे आईला कुठे ठाऊक असायचं.

बर्‍याचदा हे मिश्रण भांड्यात परतून पण करतात. या करण्यामधे मात्र करणार्‍याचे कसब लागते. पदार्थाचा मऊसूतपणा कमी होण्याची शक्यता असते आणि ती गरमच चांगली लागते. ती कधी कडक आणि चावायला अवघड होवू शकते तर कधी जळूही शकते. या पोळीची मोठी बहीण म्हणजे भाकरी. बरेच जण भाकरीबरोबर सुद्धा गुळ आणि तूप खातात. माझ्या माहितीप्रमाणे गुजरात आणि राजस्थानमध्ये भाकरीबरोबर गुळ तूप खायची रीत आहे. पण मला आवडते ती गुळ तूप पोळीच. पसंद अपनी अपनी. काही दिवसांपूर्वी TV वर एका कार्यक्रमात पूर्वीच्या काळी जिथे फारसं काही पिकत नाही अशा राजस्थानच्या वाळवंटात लोक डेझर्ट म्हणून काय खायचे तर कणकेची पुरी लाटून त्यात गुळाचा तुकडा ठेवायचा, त्याचा गोळा तयार करून तो वाफवायचा आणि तुपाबरोबर खायचा. आहे कि नाही गुळ तूप पोळीचा अजून एक प्रकार. तिचे पूर्वज म्हणू या हवं तर. डेजर्ट मधील डेझर्ट!

हा प्रकार इतका सोपा कि अगदी स्वयंपाक येत नसणार्‍या माणसाला देखील अगदी हातखंडा असल्यासारखा पदार्थ जमू शकतो. हे मी खात्रीने सांगू शकतो कारण लहानपणी जेव्हा आईला डबा तयार करणं शक्य नसायचं तेव्हा बाबा डब्यात गुळ तूप पोळी द्यायचे. नंतर नंतर तर त्यांनी त्यात प्रावीण्यही मिळवलं होतं आणि विविधताही आणली होती. वेगळा स्वाद यावा म्हणून कधी ते बडीशेप घालायचे तर कधी वेलदोडयाची पूड तर कधी अधिक पौष्टिक करण्यासाठी दाण्याचं कूट घालायचे. माझं काम खायचंच असल्याने मी ते सगळे प्रकार चाटून पुसून फस्त करायचो. यात बाबांचं पाककौशल्य अधोरेखित करायचे नसून पदार्थ करायला किती सोपा आहे हे सांगायचे आहे याची सुज्ञ खवय्यान्नी दखल घ्यावी. 

तर अशा या गुळ तूप पोळीचा मी जसजसा अधिक विचार करतो तसतसं मला तिच्यात जीवनाचे तत्वज्ञान दिसायला लागते. म्हणजे बघा ना, गुळासारखा गोडवा, तुपासरखी शुद्धता आणि पोळीसारखी लवचिकता जर आयुष्यात असेल तर आयुष्य सुखी होणार नाही का? गणपतीच्या नैवेद्यासाठी जे कणकेचे मोदक करतो त्यातही आपल्याला गुळ तूप पोळी सापडतेच कि! पदार्थाची चव तर आहेच पण करणार्‍याची माया खाणार्‍याच्या समाधानात ज्या काही थोड्या पदार्थांमधून दिसून येते त्यापैकीच हा एक असं मला वाटतं. माझ्या मते हा एक अजरामर पदार्थ आहे. जोपर्यंत गुळ आहे, तूप आहे आणि पोळी आहे तोपर्यंत या पदार्थाला मरण नाही. शेवटी एवढंच म्हणेन कि "गूळ तूप पोळी खाओ खुद जान जाओ".

1 comment:

  1. अप्रतिम, अमोल! तुझ्या लेखनात गुळाची गोडी आहे.तू गोरा आहेस नाहीतर लेखन छंदाला मुंगळ्यासारखं चिकटून रहा असं मी म्हटलं असतं !

    डाॅ उकडगावकर

    ReplyDelete