Saturday 31 March 2018

श्रावणबाळ


उस्मान आज खूपच खुश होता. गेल्या काही वर्षांत त्याने केलेली मेहनत आणि अल्लाहची मेहेरबानी यांमुळे आज त्याचे स्वप्न साकार होणार होते. त्याचे थकलेले अब्बू आणि अम्मी आज हजला पोहोचणार होते. ज्याची त्यांना आयुष्यभर आस लागली होती तो क्षण आज येणार होता. दिलावर चाचाच्या ट्रक मध्ये बसून रोज सकाळी सूर्याची उगवती किरणे बघत तो तालुक्याला जायचा. पण आज उगवलेला सूर्य आणि त्याची किरणे त्याला वेगळीच भासत होती. ती लाली आणि त्या किरणांचे तेज आधीच खुश असलेल्या उस्मानला अधिक खुलवत होती. योगायोग म्हणून कि काय पण त्याचवेळी 'सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर हैं हम खो ना जाये कही' हे गाणंही त्याचवेळी रेडिओवर लागलं होतं! सगळा माहौल कसा छान पाक आणि प्रसन्न होता. 


रोजच्या प्रमाणे दिलावर चाचाचा ट्रक दिमाखात बाजाराला चालला होता. गावातली भाजी सकाळी गोळा करायची आणि तालुक्याच्या ठिकाणी नेऊन पोचवायची हेच तर त्यांच्या रोजीरोटीचे साधन होते. भल्या पहाटे चाचा गाडी काढायचे, उस्मानला गाडीत घ्यायचे, गावाबाहेरच्या शेतांतून भाजी गोळा करायची आणि सरळ तालुक्याला जायला निघायचे. सकाळचा बाजार चालू व्हायच्या आत त्यांना पोहोचायचे असायचे त्यामुळे वाटेत न्याहारीला थांबणे वगैरे त्यांना जमायचे नाही. तालुक्याला पोहोचल्यावर भाजी उतरवायची, पैसे घ्यायचे, घरासाठी काही चीजवस्तू घ्यायच्या आणि गावाकडे जायला परत निघायचे हा त्यांचा दिनक्रम होता. 


उस्मान दिलावर चाचाच्या गाडीवर क्लिनर म्हणून काम करायचा. दिलावर चाचानीच त्याला कामावर ठेवून घेतले होते. शाळेत असताना उस्मानचे शिक्षणात लक्ष लागत नव्हते. दोन वर्षं एकाच इयत्तेत काढल्यावर अब्बू आणि अम्मीची चिंता वाढली. त्याला शिक्षणात रस नाही हे त्या दोघांनाही कळत होतं पण न शिकून कसं चालणार हि विवंचना त्यांना खात होती. पण उस्मानचं घोडं काही पुढे दामटेना. शिवाय घरात पैशाची चणचण. अब्बू मूर्त्या बनवायचे आणि अम्मी पडेल ते शिवणकाम करायची. गावात असलेला तो सामान्य मूर्तीकार. असून असून त्याचे उत्पन्न ते किती असणार. त्यामुळे अर्थार्जनासाठी मूर्त्या बनवण्याच्या व्यवसायाला जोडून अजूनही जे मिळेल ते काम अब्बू करायचे. 


वेळ पडलीच तर ते शेतांवर देखील मजूरी करायचे. असंच एका शेतावर काम करत असताना त्यांची गाठ दिलावर चाचाशी पडली होती. दिवसागणिक त्यांच्यातला स्नेह वाढत गेला. दिलावर चाचानी कधी कधी अब्बूने बनवलेल्या मूर्त्या तालुक्याच्या बाजारात नेऊन विकल्या पण होत्या. एक दिवस बोलता बोलता उस्मानचा विषय निघाला आणि चाचांना अब्बूची चिंता कळली. 


"अरे भाईजान, कशाला चिंता करता? होईल सगळं ठीक. परवरदिगार पे भरोसा रखो. वैसे मुझे मदद के लिये एक लडके कि जरूरत हैं. तुमची हरकत नसेल तर उस्मानला येऊ द्या माझ्याबरोबर. अभी जो फालतू घुमता रहता हैं इससे अच्छा दो पैसे कमा लेगा, धंदे में कुछ सिख लेगा. उपरवाल्याची मेहेरबानी झाली तर कोण जाणे माझ्यासारखा बिजनेस करेल, माझ्यापेक्षाही मोठा होईल." दिलावर चाचानी दाखवलेल्या स्वप्नाने अब्बू मोहरून गेले. त्यांच्यासमोर क्षणात उज्ज्वल भविष्यकाळ तरळून गेला. खुदकन त्यांना हसू आले आणि दिलावर चाचाचे हात हातात घेऊन त्यांनी विश्वासपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहिले. अब्बूच्या डोळ्यांत होकार होता पण त्यांना वाटले एकदा उस्मानच्या अम्मीशी बोलावं आणि मग काय ते दिलावरचाचाला सांगावं. 


"शुक्रिया भाईजान. तुमची कल्पना चांगली आहे पण एकदा उस्मानशी आणि बेगमशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो." दिलावर चाचाने "ठीक हैं, लेकिन बताना जरूर" असं म्हणत अब्बूचा निरोप घेतला. आता अब्बूच्या डोक्यात विचार घोंघावायला लागले होते. मुलाचं शिक्षण तर करायचं होतं पण त्याचवेळी पैशांचीही निकड होती. त्यांनी आणि अम्मीनी खूप स्वप्नं रंगवली होती उस्मानच्या भविष्याची. त्याला शिक्षण द्यायचं, मोठं करायचं पण काहीही झालं तरी आपल्यासारख्या हालाखीच्या आयुष्याला त्याला सामोरं जाऊ द्यायचं नाही हि दोघांचीही मनीषा होती. हातातलं काम उरकून अब्बू घरी पोहोचले. 


अम्मी काहीतरी शिवत बसली होती. अब्बू आल्याचं पाहून तिने शिवणकाम बाजूला ठेवलं आणि ती रसोईत गेली पाणी आणण्यासाठी. पाण्याचा पेला पुढे करत म्हणाली "आज जल्दी आलात? छुट्टी घेतलीत कि काय?" दोघंही एकमेकांकडे बघून हसले. दोघांनाही चांगलंच ठाऊक होतं कि हातावर पोट घेऊन फिरणाऱ्या त्या दोघांच्या शब्दकोषात 'छुट्टी' हा शब्दच नव्हता. ती एक चैनीची बाब होती त्यांच्यासाठी जिचा ते कधीच उपभोग घेऊ शकत नव्हते! पण अम्मीचा स्वभाव तसाच होता. समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरची चिंता तिला लगेच कळायची. मग ती असं काहीतरी करायची किंवा बोलायची कि वातावरण लगेच बदलून जायचं. अब्बूला तिचा हा स्वभाव खूपच आवडायचा. तिच्या हातात रिकामा पेला ठेवत अब्बू घरात गेले. आज प्रकरण काहीतरी वेगळं आहे हे चाणाक्ष अम्मीने हेरले होते. तिने पण मग आत जाऊन जेवण बनवायची तयारी सुरु केली. 


"खाना लगा दूँ?" अम्मीनी आतून आवाज दिला. अर्धवट झालेल्या सरस्वतीच्या मूर्तीकडे अब्बू टक लावून पाहात होते ते अम्मीच्या आवाजाने भानावर आले. ते उठून रसोईत येऊन बसले. अम्मीने वाढलेलं ताट पुढे केलं आणि स्मित करत म्हणाली "तुमच्या आवडीचं कालवण केलंय आज, जरा निवांत जेवा." अब्बूने जेवायला सुरूवात केली. अम्मी अजून अंदाजच घेत होती तेवढ्यात अब्बूच बोलायला लागले. 


"उस्मान कुठे आहे?"


"असेल कुठेतरी दोस्तांबरोबर, येईल थोड्यावेळानी. का? काय झालं?"


मग अब्बूनी अम्मीला आज त्यांच्या आणि दिलावर चाचाच्या झालेल्या संभाषणाचा वृत्तांत दिला. तो ऐकून अम्मीलाही पेच पडला. मुलाचं शिक्षण महत्वाचं होतंच पण घरात लक्ष्मी देखील तेवढीच गरजेची होती. सर्वात महत्वाचं म्हणजे उस्मान असाच रिकामा फिरत राहिला तर पुढे त्याचं आयुष्यात कसं होणार हा विचार घाबरवणारा होता. तिचा आणि अब्बूचा असा ठाम विश्वास होता कि अल्लाहच्या मेहेरबानीनेच त्यांना उस्मान झाला होता. त्यांच्या लग्नानंतर अनेक वर्षांनी त्यांच्या घरात पाळणा हलला होता आणि उस्मानचा जन्म झाला होता. सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटासारखा सरकला. 


धड मिसरूडही न फुटलेलं ते पोर आणि त्याला असं कामाला लावायचं? तेही केवळ चार फुटक्या कवड्यांसाठी? पण त्याच कवड्या त्यांना कुटुंब चालवण्यासाठी, रोजच्या खर्चासाठी उपयोगी पडणार होत्या हे एक प्रखर सत्यही  त्यांना माहीत होतं. महत्वाचं म्हणजे उस्मान कशात तरी गुंतून राहील आणि वेळ फुकट दवडणार नाही हा एक दिलासा होता. दिलावर चाचाने सांगितल्याप्रमाणे न जाणो एक दिवस उस्मान व्यवसायात मोठा होईलही. असे अनेक उलटसुलट विचार अम्मीने केले आणि ताळ्यावर येऊन अब्बूला म्हणाली "माझी हरकत नाही. करू दे त्याला काम. आज आपल्याला पैशांची निकड आहे आणि उस्मानने उगाचच मोकाट फिरलेलं आपल्याला आवडणार नाही."


आपल्या पत्नीचे व्यवहारी विचार ऐकून अब्बूलाही हायसं वाटलं. इतक्यात बाहेर काहीतरी खुट्ट झालं. अम्मीनी उठून बघितलं तर एक मांजर उडी मारून जाताना तिला दिसली. अब्बूही उस्मान आल्यावर त्याच्याशी बोलायचं असं ठरवून उठले. हात वगैरे धुवून बाहेर अंगणात येऊन उस्मानची वाट बघत बसले. थोड्या वेळाने उस्मान आला. उड्या मारत, गाणं गुणगुणत आलेला तो अब्बूना पाहून थबकला आणि शांतपणे घरात जाऊ लागला. अम्मीची सहमती मिळाल्याने अब्बू आता शांत झाले होते. उस्मानला त्यांनी जेवून घ्यायला सांगितलं.


रात्री निजायच्या आधी अब्बूनी उस्मानकडे कामाचा विषय काढला. तो दिलावर चाचाला तसं थोडं ओळखत होता. कामाला लागल्यावर खेळायला, बागडायला, मित्रांसोबत वेळ घालवायला मिळणार नाही या विचाराने तो थोडा खटटू झाला पण पुढे जाऊन स्वतःचा काहीतरी बिजनेस करू शकतो या अब्बूच्या सांगण्याने त्याचे डोळे चमकले. शेवटी एकदाचा उस्मान कामाला तयार झाला. त्या रात्री तिघंही शांत झोपले. भविष्याची स्वप्नं रंगवत छान झोप लागली.


दुसऱ्या दिवशी अब्बूने दिलावर चाचाला भेटून उस्मानने त्यांच्याकडे काम करायला हरकत नाही असे सांगितले. दिलावर चाचा पण खूष झाले आणि त्यांनी अब्बूला मिठीच मारली. "कलसे ही भेज दो फिर उसे" असं म्हणाले. अब्बूनी पण होकार दिला आणि कामाला लागले.


बघता बघता उस्मान दिलावर चाचाच्या हाताखाली तयार झाला. त्यांना सगळ्या कामात मदत करू लागला. चाचाही त्याच्या कामाबाबत समाधानी होते. बऱ्याचदा तालुक्याकडून येताना ते एका ढाब्यावर जेवायला थांबत असत. छान जेवायचं आणि थोडी वामकुक्षी घेऊन परत गावाकडे निघायचं हे त्यांचं ठरलेलं असे. चाचा वामकुक्षी घेत असताना उस्मान तिथे आलेल्या इतर क्लिनर्ससोबत क्रिकेट खेळत असे. त्यामुळे त्याला त्या ढाब्यावर थांबणं आवडायचं. जेवणापेक्षाही या नवीन मित्रांसोबत खेळता येते याचा त्याला जास्त आनंद असे. कधी कधी चाचाही त्यांच्यात सामील व्हायचे. चाचा उस्मानला त्यांचा मुलगा असल्यासारखंच वागवायचे.


बघता बघता दहा वर्षांचा काळ कसा सरला हे कोणालाच कळले नाही. आता उस्मान विशीतला तरुण होता. त्याचा कामातच इतका वेळ जायचा कि त्याला इतर गोष्टींकडे फारसे लक्ष देता यायचे नाही. त्याला अपवाद होती ती तीन माणसं. अब्बू, अम्मी आणि सईदा. उस्मानच्या घरापासून चार घरं सोडून सईदा राहायची. एक छोटी, चुणचुणीत, गोरटेली, लांब केस असलेली सईदा अम्मीकडे बऱ्याचदा यायची शिवणकाम शिकायला. आताशा उस्मानला ती आवडू लागली होती आणि तिच्यासोबतच निकाह करावा अशी त्याची इच्छा होती. तिलाही बहुदा तो आवडत असावा हे तिचं त्याच्याप्रती असलेलं वागणं बघून कळत होतं.


एका रात्री झोपायच्या आधी अम्मी उस्मानच्या केसांना तेल लावून मालीश करत होती. उस्मानचे नेटाने काम करणे आणि लहान वयात जबाबदारी उचलून घरखर्च सांभाळण्यास हातभार लावणे या गोष्टींचा तिला अभिमान होता. मालीश करताना आईची माया बोटांतून पाझरत होती.


मधेच उस्मानने विचारलं "अम्मी एक बात बताओ..."


"पूछो बेटे" अम्मीला कुतूहल वाटलं.


"आपकी ऐसी कोई ख्वाहिश हैं जो अभी तक पुरी नही हुई?"


आता हे काय नवीनच असं वाटून ती म्हणाली "ये आज क्या सुझी तुझे? माझी अशी काय अपुरी इच्छा असणार? मी खुश आहे."


"फिर भी बताओ ना...कुछ तो होगी" उस्मानने हट्टच धरला.


तिने बराच टाळायचा प्रयत्न केला पण तो मागेच लागल्यावर ती म्हणाली "अब्बूला आणि मला मरायच्या आधी एकदा हजला जाऊन अल्लाहला शुक्रिया म्हणायचं आहे."


ते ऐकून उस्मान उठला अम्मीला त्याने आलिंगन दिलं तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि सरळ झोपायला आत निघून गेला. अम्मीला त्याचं हे वागणं विचित्र वाटलं. उस्मानच्या डोक्यात काय चाललेलं असतं हे त्याचं तोच जाणे असा विचार करून तिने तेलाची बाटली उचलली आणि दिवे बंद करून निजली.


दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून उस्मान नेहमीप्रमाणे कामावर गेला. आता अम्मीने बोलून दाखवलेली इच्छा पूर्ण करायची हे त्याच्या मनाने घेतले होते. अब्बू आणि अम्मीने किती खस्ता खाल्ल्या होत्या हे त्याने जवळून पहिले होते आणि त्या कष्टाची एक प्रकारे परतफेड म्हणून त्याला अम्मीची ख्वाहिश पूर्ण करायची होती. त्याने दिलावरचाचाकडे हा विषय काढला आणि साधारण खर्चाचा अंदाज घेतला. चाचाने त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे त्याला साधारण अंदाज दिला. रक्कम तशी मोठी होती पण अम्मीची इच्छा पूर्ण करायचीच या ध्येयापायी तो अधिक जोमाने काम करू लागला.


साधारण दोन वर्षांनंतर आधीचे साठवलेले पैसे, जादा काम करून मिळवलेले पैसे आणि दिलावर चाचाच्या ओळखीने उसने घेतलेले पैसे अशी सगळी रक्कम गोळा करून त्याने अम्मी आणि अब्बूच्या हज यात्रेची तयारी केली.


"अम्मी, आपकी ऐसी कोई ख्वाहिश हैं जो पुरी नाही हुई?" अम्मी त्याच्या केसांना मालीश करत असताना त्याने परत विचारलं . शेजारी अब्बू पण बसले होते.


आता मात्र अम्मीला हसू आलं . "हाँ, मुझे अब बहु चाहिए।" असं म्हणत ती आणि अब्बू दोघेही हसायला लागले.


"अम्मी, मी मजाक करत नाही. पण दोन वर्षांपूर्वी तू मला एक इच्छा बोलून दाखवली होतीस...आठवतं?" उस्मान तिच्याकडे तोंड करून म्हणाला.


"हो पण मी ते गमतीने म्हणले होते बेटा." अम्मी समजावण्याच्या सूरात म्हणाली.


"अम्मी, मी तुझी आणि अब्बूची हज यात्रेची सोय केली आहे." उस्मानने एकदम धक्काच दिला.


ते शब्द ऐकताच अम्मीच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. ती अब्बूकडे पाहात राहिली आणि आता काय बोलावं हे तिला सुचत नव्हतं. अब्बूही ते ऐकून थक्क झाले होते. त्यांच्या थकलेल्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. आता वयानुसार त्यांचं शरीर थरथरत होतं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक मूर्त्या घडवल्या होत्या पण त्या मूर्तीतील देव आज साक्षात समोर उभा आहे कि काय असे त्यांना काही क्षण वाटले. थरथरत्या हातांनी त्यांनी उस्मानचा चेहरा हातांत घेतला आणि त्याला मिठीच मारली. आता उस्मानलाही रडू आवरले नाही. त्याने अब्बू आणि अम्मीला कवटाळले आणि तिघेही आनंदाश्रूंनी न्हाऊन निघाले.


यात्रेची तयारी सुरू झाली. अम्मीच्या आनंदाला पारावार नव्हता. तिला अगदी भरून पावल्यासारखे वाटत होते.


एक दिवस जेवणं चालू असताना अम्मी म्हणाली "हजहून आलो कि तुझा निकाह लावणार आहे."


उस्मानला ते ऐकून गुदगुल्या झाल्या पण ते न दाखवता तो म्हणाला "आधी तुम्ही जाऊन तर या मग बघू."


आपल्याला सईदा आवडते हे अम्मीला कसं सांगायचं हे त्याला सुचत नव्हतं. अम्मी म्हणाली "माझ्या बघण्यातली एक मुलगी आहे आणि तीच मला बहु म्हणून हवी आहे."


"अम्मी, आता कशाला तो विषय? आपण बोलू ना नंतर त्यावर." उस्मान टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत होता.


"नाही, मला ते काही माहीत नाही. मला वचन दे कि तीच मुलगी बहू म्हणून येणार."


आता मात्र कमाल झाली. अम्मी  असं कसं कुठल्याही मुलीबरोबर माझा निकाह लावू शकते? मी सईदाला काय जवाब देणार असे विचार त्याच्या मनात आले.


"हा ठीक आहे दिलं वचन." अम्मीला नंतर पटवू असा विचार करून त्याने मोघम उत्तर दिलं.


"ठीक आहे तर मग मी सईदाच्या अम्मीशी बोलून ठेवते" अम्मी उस्मानची प्रतिक्रिया बघत म्हणाली.


ते ऐकून उस्मान चक्क लाजलाच आणि उठूनच गेला. अम्मीलाही मनापासून हसू आलं.


यात्रेची तयारी करण्यात दिवस कसे गेले कळलंच नाही आणि बघता बघता निघायचा दिवस आला. आयुष्यभर कधीही गावाची वेस न ओलांडलेले अब्बू आणि अम्मी आता हज यात्रेला निघाले होते. त्यांना अगदी कृतकृत्य वाटत होतं. उस्मानने त्यांची सगळी व्यवस्था केली होती.

"मी तुझ्या आणि सईदासाठी अल्लाहकडे दुवा मागेन" असं म्हणून अम्मीनी उस्मानला जवळ केलं आणि ती अब्बू बरोबर प्रवासाला निघाली. उस्मानलाही तो अब्बू अम्मीची ख्वाहिश पुरी करू शकला याचा अभिमान वाटला आणि तो स्वतःवरच खुश झाला.


'सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर हैं हम खो ना जाये कही' या सुरांच्या साथीने उस्मान आणि दिलावर चाचा निघाले होते. वेळापत्रकाप्रमाणे दुपारनंतर अब्बू आणि अम्मी हजला पोहोचणार होते. उस्मानच्या कामात आज एक वेगळीच उर्जा होती. दिलावर चाचालादेखील तो फरक जाणवत होता. त्यालाही उस्मानचा खूप अभिमान वाटत होता. त्याची ख़ुशी वाढवण्यासाठी ते उस्मानला म्हणाले "उस्मान, आज खुशीचा दिवस आहे. आज दुपारी ढाब्यावर बडा खाना खाऊ." उस्माननेही त्याला आनंदाने दुजोरा दिला.


सकाळची सगळी कामं उरकून दिलावर चाचाने काही खरेदी केली. यावेळेस उस्मानने देखील खरेदी केली खास सईदासाठी. एक छानशी अत्तराची बाटली आणि काही फुलं. दिलावर चाचाने त्याच्याकडे सूचकपणे पाहिलं तसा तो चक्क लाजला. चाचा मनमुरादपणे हसले.


आता दुपारची उन्हं डोक्यावर आली होती. दोघंही परतीच्या प्रवासाला निघाले. जसजसा ढाबा जवळ येऊ लागला तसतशी अधिकच भूक लागायला लागली. ढाब्यावर उतरताच चाचानीच खाना मागवला. उस्मानला ती जणू दावतच होती. दोघंही व्यवस्थित जेवले. चाचा वामकुक्षी घ्यायला गेले आणि उस्मान त्याच्या मित्रांसोबत गप्पा ठोकायला. तास दोन तासांच्या विश्रांती नंतर दोघेही निघाले. आता उस्मानला सईदाला  भेटायची ओढ लागली होती. कधी एकदा तिला भेटतो, तिच्यासाठी घेतलेल्या वस्तू तिला देतो आणि तिच्याशी अम्मीने सांगितलेल्या गोड बातमीबद्दल बोलतो असे झाले होते.


आता संध्याकाळ होत चालली होती आणि गावातले काही दिवे मिणमिणत होते. दिलावर चाचा सावधपणे गाडी चालवत होते. पण नियतीच्या मनात बहुदा काहीतरी वेगळंच होतं. गाडी घाटात असताना, गाव समोर दिसत असताना एका वळणावर अचानक दिलावर चाचाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि आक्रीत घडलं. काय झाले, कसे झाले हे कळायच्या आतच गाडी रस्त्यावरून घसरली आणि खोल दरीकडे आदळत आपटत गेली. चाचा आणि उस्मान दोघांनाही आता समोर अंत दिसू लागला. अखेरीस एका मोठ्या खडकावर आपटून ट्रकचे तुकडे तुकडे झाले. त्या भीषण अपघातात दोघेही अल्लाहला प्यारे झाले. कधी कधी नियती इतकी कठोर आणि निष्ठुर का होते हे अगम्य आहे.


अब्बू आणि अम्मी हजला पोहोचले होते. उस्मानच्या आठवणीने त्या दोघांचाही उर भरून आला होता. अल्लाहचे किती आभार मानावेत हे त्यांना सुचत नव्हतं. तिकडे त्या दोघांच्या आधीच उस्मान अल्लाहच्या भेटीला गेला होता. त्या दरीतल्या रानातील पडलेल्या अंधारात, फुटलेल्या अत्तराच्या कुपीतून सुगंध दरवळत होता आणि सईदासाठी उस्मानने घेतलेली फुलं सगळीकडे विखुरली होती. संध्याकाळच्या दिवेलागणीच्या वेळी सईदाला उचकी लागली होती आणि ती थांबतच नव्हती. तिने उठून पाणी प्यायलं आणि दिवे लावले. त्याचवेळी गावातल्या मशीदीतून आर्त अशी बांग ऐकू येत होती 'अल्ला हू अकबर...' आणि तेव्हा श्रावणबाळ दीर्घ निद्रा घेत होता.

No comments:

Post a Comment