फोटो सौजन्य: दिनारा कास्को |
पेस्ट्री किंवा केक म्हणलं कि आपल्या डोळ्यांसमोर काय येतं?
केक म्हणाल तर अर्थातच चौकोनी, आयताकृती, गोल किंवा फार फार तर एखाद्या कार्टून कॅरॅक्टरचा आकार. पेस्ट्री तर आपल्याला फारश्या वेगळ्या आकारात दिसतच नाहीत...आयताकृती किंवा त्रिकोणी. आपण भारतीय तसे फारसे केक वेडे नाही. आपल्याकडे केक म्हणजे वाढदिवस हे एक समीकरणच आहे. आताशा तो इतर प्रसंगांमध्येही दिसू लागला आहे पण ते म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे असे मला वाटते. असो, मुद्दा तो नाही. पण जिच्याबद्दल तुम्ही पुढे वाचणार आहात तिचं काम बघून केकचा किंवा पेस्ट्रीचा समावेश आपल्या आनंदाच्या, उत्सवाच्या प्रसंगांमध्ये जरूर व्हावा असं तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही.
दिनारा कास्को, या युक्रेनियन महिलेने कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्या आर्किटेक्चरल ज्ञानाचा वापर ३ वर्षं नेदरलंडमधील एका कंपनीत डिझायनर आणि फोटोग्राफरची नोकरी करत केला. पण तिला खरी आवड होती ती पेस्ट्री बनवण्याची. याचा शोध तिला वयाच्या १७ व्या वर्षापासून करत असलेल्या जवळपास १६ देशांच्या भ्रमंतीनंतर लागला. मग पुढे आई झाल्यावर तिच्याकडे जो रिकामा वेळ होता त्यात तिला तिच्या या पेस्ट्री बनवण्याच्या आवडीला खरा न्याय देता आला. तिच्या आर्किटेक्चरल ज्ञानाची सोबत होतीच. मग काय, स्थापत्यकला आणि पाककला यांच्या एका दुर्मिळ संयोगातून एका अत्यंत विलोभनीय आणि रूचकर गोष्टीचा जन्म झाला.
फोटो सौजन्य: दिनारा कास्को |
फोटो सौजन्य: दिनारा कास्को |
फोटो सौजन्य: दिनारा कास्को |
आता हे फोटो पाहून तुमच्या लक्षात आलं असेलच कि असे केक्स बनवणे हे काही सोपं काम नाही. आणि ते अगदी खरं आहे. पण अवघड काम सोपं करायलाच तर आपण वेगवेगळं तंत्रज्ञान शोधतो, नाही का? असंच एक तंत्रज्ञान आहे आणि ते म्हणजे थ्री डी प्रिंटींग (3D Printing). तुम्ही कदाचित हा शब्द ऐकला असेलही आणि त्या बाबतीत तुम्हाला माहितीही असेल. पण ज्यांना हे नक्की काय प्रकरण आहे हे जाणून घ्यायचे असेल त्याांच्यासााठी माहिती देतो.
आपण जेव्हा कागदावर किंवा कापडावर काहीही छापतो तेव्हा ते टु डी प्रिंटींग (2D Printing) असतं. म्हणजेच त्याला दोन मिती (dimensions) किंवा अक्ष (axes) असतात. सहसा आडव्या अक्षाला X आणि उभ्या अक्षाला Y म्हणतात. आपण शाळेत वापरलेला ग्राफ पेपर डोळ्यांसमोर आणा. आता कल्पना करा कि एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवलेल्या कागदावर आपण तिसर्या अक्षाला (Z) धरून वरच्या दिशेने कागद जोडत आहोत. काय होईल? एक गठ्ठा तयार होईल. असं समजा कि तो एक ठोकळा आहे. म्हणजेच द्विमितीय गोष्टीला जर आपण तिसरी मिती जोडली तर त्यापासून एक वस्तू तयार होते.
थ्री डी प्रिंटींगमध्ये हेच होते. एका ठराविक मटेरियलचे एकावर एक थर टाकले जातात आणि शेवटी आपल्याला एक घन वस्तू मिळते. पण हे थर कुठे आणि कसे टाकायचे हे ती वस्तू डिझाईन करणारी व्यक्ती ठरवते. त्यासाठी डिझाईन सॉफ्टवेयर वापरली जातात. उदाहरणादाखल खलील व्हिडिओ बघा:
दिनाराने हेच तंत्रज्ञान वापरून केकरूपी अशा काही कलाकृती तयार केल्यात कि बघणार्याच्या डोळ्यांचे पारणे फिटते. म्हणजे ती चक्क केकचे डिझाईन सॉफ्टवेयर वापरून करते आणि त्याचे मोल्ड थ्री डी प्रिंटींग तंत्रज्ञानाने बनवते. स्थापत्य शास्त्रातील अलगोरीदम्स, वेगवेगळे चित्रविचित्र आकार हे तिने केकच्या रूपाने सादर केले आहेत. थोडक्यात क्लिष्ट वाटणार्या या गोष्टी तिने रंजक आणि रुचकर बनवल्या आहेत. तिच्या आणखी काही मंत्रमुग्ध करणार्या कलाकृती बघा:
फोटो सौजन्य: दिनारा कास्को |
फोटो सौजन्य: दिनारा कास्को |
फोटो सौजन्य: दिनारा कास्को |
आपल्या साचेबद्ध नजरेतून बघितलं तर हे केक वाटतात का? पण ते आहेत आणि ते खायचेच केक आहेत. तोंडात बोटं घालायला लावणारा हा व्हिडिओ बघा:
आहे ना गंमत? हे केक म्हणजे स्थापत्य शास्त्रातील मॉडेल्स वाटतात पण ती स्टील, सिमेंट किंवा काचेची नसून ती मेरिंग, जिलेटीन आणि चॉकलेटची आहेत! एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते कि तिने त्रिकोणमिती, व्होरोंनी डायग्राम आणि बायोमिमीक्री यांसारख्या भूमितीय रचनांची तत्त्वं केक बनवण्यासाठी वापरली आहेत.
२०१७ च्या सॅन मिगुएल रिच लिस्ट मध्ये आता तिने स्थान पटकावलं आहे. ही जगभरातल्या अशा लोकांची लिस्ट असते ज्या एक वेगळ्या प्रकारची संपत्ती बाळगून असतात. हा त्या एकमेवाद्वितीय लोकांचा समुदाय असतो ज्या ऐहिक गोष्टींपेक्षा विविध अनुभवांना अधिक महत्व देतात. दिनाराबद्दल या लिस्ट मध्ये असं लिहिलं आहे कि तिच्यासारखे कल्पक आणि अभिनव कलाकार खूपच थोडे आहेत. ही क्लिष्ट आणि अचूक निर्मिती केवळ केक नाही तर ती खाद्य संस्कृतीतील एक कला आहे आणि दिनारासाठी एक संपन्न आयुष्य जगण्याचे माध्यम आहे.
असं काही पाहिलं, वाचलं कि आपोआप नतमस्तक व्हायला होतं. केक आणि पेस्ट्री बनवण्याच्या या कलेला एका वेगळ्याच उंचीवर दिनाराने नेऊन ठेवले आहे. आता तुम्हीच ठरवा तिला आर्किटेक्ट म्हणायचं, शेफ म्हणायचं कि एक अदाकारा?
फोटो सौजन्य: दिनारा कास्को |
फोटो सौजन्य: दिनारा कास्को |
फोटो सौजन्य: दिनारा कास्को |
(अधिक माहितीसाठी कृपया www.dinarakasko.com या संकेतस्थळाला भेट द्या. )
No comments:
Post a Comment