Thursday, 26 March 2020

OK ची कहाणी

फोटो सौजन्य: photosforyou from Pixabay
तुम्ही दिवसातून बोलताना किती वेळा 'OK' म्हणता याची कधी मोजदाद ठेवली आहे का? किती साधा सोपा शब्द आणि किती वेगवेगळ्या प्रसंगी आपण त्याचा वापर करतो आणि तेही विविध भावना व्यक्त करण्यासाठी. म्हणजे बघा ना, एखादा सिनेमा कंटाळवाणा असेल आणि जर कुणी विचारलं तर आपण निरूत्साही होऊन म्हणतो "OK", किंवा एखाद्या प्रसंगी कुणाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण म्हणतो "OK, तर पुढची गोष्ट आता आपण अशी करू या", किंवा एखाद्याने काही सुवार्ता दिली तर आनंदाने म्हणतो "OK मस्तच". रस्त्यांवर हमखास आपल्याला ट्रक्सच्या मागे लिहीलेलं दिसतं ते "HORN OK PLEASE". अर्थात त्यात "HORN PLEASE" आणि "OK" असे दोन शब्द असावेत असा माझा समज आहे. पण "HORN" आणि "PLEASE" या दोन शब्दांमध्ये "OK" लिहीण्याचे कारण काही कळू शकलेले नाही.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हा शब्द २०० वर्षदेखील जुना नाही! म्हणजे लोक या शब्दाचा वापर बोलताना किंवा लिहिताना करतही नव्हते! आता कदाचित मनातल्या मनात आश्चर्याने तुम्ही "OK" म्हणालाही असाल. अमेरिकन इंग्रजी भाषेत उगम होऊन हा शब्द पुढे ब्रिटीश इंग्रजीत रूळला आणि पुढे जगातील इतर अनेक भाषांत तो रूढ झाला.

"OK" च्या जन्माच्या अनेक आख्यायिका आहेत. वेगवेगळ्या भाषांतील विविध संज्ञांचा तो अपभ्रंश आहे असं काही जणं म्हणतात तर कुणी म्हणतं कि काही बेकर्स त्यांच्या नावाचे इनिशियल्स म्हणून बिस्किटांवर "OK" छापायचे तर कुणी म्हणतं जहाज बांधणी करणारे लोक काही विशिष्ट लाकडावर "outer keel" असं लिहीण्यासाठी "OK" लिहायचे. असे एक ना अनेक तर्क वितर्क "OK" शब्दाचे मूळ शोधण्यासाठी केले गेले.

ॲलन मेटकाफ नावाच्या व्यक्तीने "OK" च्या उगमावर बरेच काम केलेले आहे. त्यांनी त्यांच्या संशोधनावर आधारित एक पुस्तकही लिहिले आहे ज्याचे नाव आहे "ओके: दि इम्प्राॅबॅबल स्टोरी ऑफ अमेरिकाज् ग्रेटेस्ट वर्ड". दोन अक्षरी शब्दाच्या उगमाची माहिती देणार्‍या पुस्तकाचे शीर्षक किती मोठे! त्यांच्या म्हणण्यानुसार बाॅस्टन माॅर्निंग पोस्ट नावाच्या एका वृत्तपत्राच्या संपादकीयात २३ मार्च १८३९ रोजी 'ॲन्टी बेल रिंगींग सोसायटी' असं विचित्र नाव असलेल्या एका संस्थेबद्दल एक विनोदी लेख छापून आला होता. त्यात लेखकाने "o.k." ही अक्षरं "all correct" हे लिहीण्यासाठी संक्षेपाने वापरली होती. "All Correct" साठी "o.k." लिहीणं ही त्या काळी काही वेगळी बाब नव्हती. आज आपण जसे OMG, LOL वगैरे संक्षेप वापरतो तसेच त्या काळी काही संक्षेप अस्तित्वात होते. म्हणजे सध्याच्या संक्षेपांचे पूर्वजच म्हणा ना. उदाहरणार्थ "i.s.b.d." (it shall be done), "r.t.b.s." (remains to be seen), "s.p." (small potatoes) इत्यादी इत्यादी. आता ते आपल्याला वाचायला विचित्र वाटतात पण त्या त्या काळातील भाषा असते. आपण आपली मराठी बोलीभाषा कशी बदलत गेली हे बघतोच की. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेली शिवकालीन भाषा आणि आताची भाषा. किती फरक आहे बघा ना. तुलना करायची झाली तर कालखंड साधारण तोच आहे.

खरं तर त्या काळी संक्षेप वापरण्याची एक वेगळीच गंमत होती. म्हणजे "no go" साठी k.g. (know go) आणि "all right" साठी o.w. (oll write) असे काही तरी विचित्र संक्षेप होते. त्यामुळे oll korrect साठी o.k. लिहिणं हे एकदम ओकेच होतं. आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं कि बाकी सारे संक्षेप लोप पावले पण OK तेवढा तरला. ॲलन मेटकाफच्या म्हणण्याला भक्कम पाया होता तो प्रा. ॲलन वॉकर रीड यांच्या सखोल अभ्यासाचा. कोलंबिया विद्यापीठातील या प्राध्यापक महाशयांनी अनेक वर्षं 'OK' संबंधित ऐतिहासिक पुरावे गोळा करण्यात घालवली आणि स्वतःचा शोध एका लेखमालिकेत प्रसिद्धही केला.

OK चं नशीबही जोरावर होतं. १८४० मधे निवडणूकीत एक उमेदवार होता ज्याचं नाव होतं मार्टिन वॅन बुरेन आणि त्याचं टोपणनाव होतं ओल्ड किंडरहूक (Old Kinderhook). काही ट्यूब पेटली का? या टोपणनावाची आद्याक्षरे काय आहेत बघा. त्याच्या समर्थकांनी एक क्लब स्थापन केला होता ज्याचं नाव होतं O.K. Club. मग काय? आपला "oll korrect" वाला OK या टोपण नावात केव्हा मिसळून गेला हे कोणालाच कळले नाही. विरोधी उमेदवार होता हॅरिसन. जेव्हा बुरेन गट आणि हॅरिसन गट यांमध्ये राजकीय वादविवाद व्हायचे तेव्हा OK ची सरमिसळ घोषणाबाजी आणि एकमेकांवर चिखलफेक करताना व्हायची. त्याचे वेगवेगळे अर्थ निघू लागले out of kash, out of karacter, all kwarrelling आणि बरंच काही.

साधारण १८७० च्या दशकात टेलिग्राफ चालक जे होते त्यांच्यासाठी संदेश मिळाल्याची पोचपावती देण्याचा "OK" हा खूपच प्रचलित शब्द झाला होता. तिथूनच अमेरिकेतील महान शब्द बनण्याचा त्याचा प्रवास सुरू झाला.

पण OK या शब्दाचं यश त्याचं उगमस्थान विसरण्यातच आहे. तो कुठून आला याच्या विस्मरणाने आपण सर्वांनीच त्याला आपलेसे केले आहे. आता हा शब्द संस्कृती, भाषा, देश या सर्वांच्या पलीकडे गेला आहे. वैयक्तिक संवाद असो किंवा व्यावसायिक संवाद OK चे स्थान आता जणू अढळ आहे. दोनच अक्षरी शब्द पण किती उपयोगी आहे. मला तर तो "मूर्ती लहान पण किर्ती महान" या श्रेणीतला वाटतो. काही शब्दच असे असतात कि जे बरंच काही बोलून जातात आणि ते बोलणं वक्त्यालाही कळतं आणि श्रोत्यालाही. एका पांगळ्या विनोदातून जन्मलेला हा शब्द आज अख्ख्या जगाने स्वीकारला आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला तर एकदम OK वाटतं आहे. तुम्ही कसे आहात?


संदर्भ: अरिका ओकरेंट आणि मेंटल फ्लॉस यांचा एक लेख

No comments:

Post a Comment