Friday 24 April 2020

शांत निसर्ग का कोपला?

होऊन अनावर वरूणराज बरसला
नदी नाल्यात जणू प्रलयच आला
शुष्क पानासम माणूस वाहून गेला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?


क्रोध अनावर वनदेवीचा झाला
वणवा चहूकडे मोकाट पिसाटला
निष्प्रभ माणूस भस्म जाहला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?


रत्नाकर तो अपरिमीत खवळला
फणा काढून फुत्कारीतो वादळाला
फोलपटासम माणूस उडाला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?


हिमालय तो रागाने थरथरला
आवेगाने चित्कारत कडाडला
खड्यासम माणसास दूर सारला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?


सुचविले निसर्गाने पदोपदी माणसाला
कृत्रीम बुद्धी अन् ऐहिकात माणूस गुंगला
दाखवून भावनाशून्य प्रतीमानव ललकारीतो त्याला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?


दुर्लक्षिले माणसाने जन्मदात्या निसर्गाला
लुटले त्यास चौफेर रिझवण्या हव्यासाला
बुभुक्षित माणसाची भूक पेटली शिगेला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?


निसर्ग उलटला माणूस आला काकुळतीला
तत्परतेेेने श्रीरंगाचा धावा केला
मीच पर्वत, मीच समुद्र, मीच अग्नी, मीच वरूण भगवंत तो वदला
उमगले अंततः ब्रम्हांडातील त्या नगण्य कणाला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला

No comments:

Post a Comment