Wednesday 20 September 2017

एकहाती वैश्विक अणुयुद्ध टाळणार्‍या रशियन वीरास आदरांजली



फोटो सौजन्य: गुगल इमेजेस



सोव्हिएत सैन्यातील अधिकारी स्टानिस्लाव पेट्रोव ज्यांनी संगणकाऐवजी अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवला आणि एक हाती वैश्विक अणुयुद्ध टाळले ते वयाच्या ७७ व्या वर्षी निधन पावले.

१९८३ मध्ये त्यांचा देशात, सोविएत युनियनमध्ये आधीच धोक्याचा इशारा दिलेला होता; त्यांनी एक कोरियन एयर जेट पाडलेले असल्याने प्रतिवार होण्याची शक्यता होती. अशातच लेफ्टनंट कर्नल साहेबांनी संगणकावर एक सूचना पाहिली जी हे दर्शवत होती कि अमेरिकेने त्यांच्यावर आण्विक मिसाईलचा हल्ला चढवला आहे. त्यांच्याकडे मिसाईल सोडल्याची खात्रीलायक माहिती नव्हती आणि पुढची कृती ठरवण्यासाठी केवळ काही मिनिटांचा अवधी होता.

जेव्हा शीतयुद्ध ऐरणीवर होते तेव्हा २६ सप्टेंबरला मॉस्कोजवळच्या सेर्पुखोव - १५ बंकरवर ते अधिकारी म्हणून होते. केवळ साडेतीन आठवड्यांपूर्वीच सोविएत सैन्याने एक बोइंग ७४७ पाडले होते ज्यात त्यातील सर्वच्या सर्व २६९ लोक मृत्युमुखी पडले होते. उपग्रहाद्वारे मिळणारी आगाऊ धोक्याची सूचना बघून वरिष्ठांना युएसएसआरवर होणार्‍या होऊ घातलेल्या हल्ल्याची खबर देणे हि लेफ्टनंट कर्नल पेट्रोवची जबाबदारी होती. असा हल्ला झाल्यावर, अमेरिकेवर आण्विक प्रतिहल्ला चढवण्याची युद्धनीती सोविएत युनियनने आखलेली होती. ती परस्पर विश्वस्त विध्वंस सिद्धांताची गरज होती.

मध्यरात्रीनंतर ००४० वाजता, बंकरच्या संगणकांनी सूचना दिली कि एक अमेरिकन मिसाईल सोविएत युनियनच्या दिशेने येत आहे. लेफ्टनंट कर्नल पेट्रोवनी तर्क लावला कि ती संगणकाची चूक असावी कारण जर अमेरिकेला सोविएत युनियनवर हल्ला करायचा असता तर त्यांनी केवळ एक मिसाईल सोडली नसती - तर बर्‍याच मिसाईल्स एकाचवेळी सोडल्या असत्या. शिवाय, उपग्रह प्रणालीची अचूकता पूर्वी प्रश्न उपस्थित करणारी होती, म्हणून त्यांनी ती सूचना चूक म्हणून खारीज केली आणि असा निष्कर्ष काढला कि अमेरिकन सैन्याने कुठलीच मिसाईल सोडलेली नाही.

तथापि, थोड्या वेळानंतर, संगणकांनी दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी मिसाईल सोडल्याची सूचना दिली. तरीही पेट्रोवना वाटलं कि संगणक चूक आहे पण त्यांच्या शंकेला पुष्टी देणारा इतर कुठलाही महितीचा स्त्रोत उपलब्ध नव्हता. २२ मिनिटांत त्यांना खात्री पटली असती. सोविएत युनियनच्या जमीनीवरील रडार मध्ये क्षितिजापलीकडील मिसाईल्स हेरण्याची क्षमता नव्हती, म्हणजेच जमीनीवरील रडार जेव्हा तो धोका निश्चितपणे हेरणार होता तेव्हा खूप उशीर होणार होता.

पेट्रोवची द्विधा मनःस्थिती अशी होती: खर्‍याखुर्‍या हल्ल्याकडे जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर सोविएत युनियन कुठलीही आगाऊ सूचना न मिळता किंवा प्रतिहल्ल्याची संधी न मिळता आण्विक शस्त्रांनी उद्ध्वस्त होणार होतं. दुसर्‍या बाजूला, त्यांनी जर न झालेल्या हल्ल्याची खबर वर दिली असती तर त्यांच्या वरिष्ठांनी शत्रूवर तेवढाच भयंकर हल्ला चढवला असता. दोन्ही घटनांमध्ये लाखो लोक मेले असते. ते चूक असले असते तर सोविएत युनियनवर आण्विक मिसाईल्सचा वर्षाव झाला असता हे समजूनही, पेट्रोवनी अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवायचा ठरवलं आणि संगणकाची सूचना चुकीची आहे हे जाहीर केलं.

प्रचंड तणावाखाली असूनही पेट्रोवचा निर्णय निकोप होता आणि त्यामुळे एक भीषण आण्विक युद्ध टळलं.

संभाव्य आण्विक संकट टाळूनसुद्धा, संगणक प्रणालीची सूचना न मानून लेफ्टनंट कर्नल पेट्रोव यांनी आज्ञेचा भंग केला होता आणि सैनिकी शिष्टाचाराची अवज्ञा केली होती. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांची सखोल उलटतपासणी करण्यात आली.

सोविएत सैन्याने पेट्रोवना त्यांच्या या कृतीबद्दल कुठलीही शिक्षा दिली नाही पण त्यांचा सत्कार किंवा सन्मानही केला नाही. त्यांच्या कृतींमुळे सोविएत सैन्यातील त्रुटी समोर आल्या होत्या ज्यामुळे त्यांच्या वरिष्ठांची बदनामी झाली होती. कागदपत्र नीट न ठेवल्याचे कारण देऊन त्यांना अधिकृतरित्या तंबी देण्यात आली. एक भरवश्याचा अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहणं बंद झालं आणि त्यांची एके काळी उज्ज्वल असलेली सैनिकी कारकीर्द संपुष्टात आली. त्यांना एक कुठलेसे कमी महत्वाचे पद देण्यात आले आणि शेवटी ते सैन्यातून निवृत्त झाले.

पेट्रोवनी नंतरचा काळ तसा गरिबीतच काढला. त्यांनी त्यांचं निवृत्त आयुष्य फ्रायाझिनो नावाच्या गावात व्यतीत केलं. त्यांनी म्हणलं आहे कि त्यांनी त्या दिवशी जे केलं त्यासाठी ते स्वतःला वीरपुरुष समजत नाहीत, "मी फक्त माझं काम करत होतो."

२१ मे २००४ रोजी सान फ्रान्सिकोस्थित असोसिएशन ऑफ वर्ल्ड सिटीजन्सने कर्नल पेट्रोवला भीषण संकट टाळण्यात महत्वाची भूमिका निभावल्याबद्दल त्यांचा वर्ल्ड सिटीजन किताब एक चषक आणि १,००० डॉलर्सच्या रूपाने दिला. जानेवारी २००६ मध्ये पेट्रोव न्यू यॉर्कला गेले जिथे असोसिएशनने त्यांना संयुक्त राष्ट्रसंघात गौरवले.

"द मॅन हू सेव्हड द वर्ल्ड" नावाचा चित्रपटही या सत्य घटनेवर आधारीत आहे. त्याची झलक नक्कीच तो थरार जागवते. चित्रपटाची झलक बघण्यासाठी इथे क्लिक करा.

अशा या खर्‍या योद्धयाला आणि वीरपुरुषाला सलाम!


(माहिती सौजन्य: जी एन नेटवर्क)







No comments:

Post a Comment