Wednesday 5 April 2017

चिन्नम्मा कापी

"चिन्नम्मा कापी" अशी पाटी असलेली टपरी आमच्या ऑफिसच्या खिडकीतून रोज मला दिसायची. दिसायची कसली सतत खुणवायची. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आमच्या ऑफिसमधून त्या टपरीसमोरील गर्दी आणि चिन्नम्माच्या लगबगीचा अंदाज अगदी व्यवस्थित यायचा. शेजारीच तिच्या मुलाची म्हणजे स्वामीची पानाची टपरी. "दोन वेगळ्या टपऱ्या का?" असं चिन्नम्माला विचारलं तर हातवारे करत म्हणायची, "म्येरा बिजनेस म्येरा, एक सात किया तो गडबड". तिला तिच्या मुलावरच विश्वास नव्हता. एका अर्थी ते बरोबरही होतं. मुलाचे आणि तिचे बऱ्याच गोष्टीत मतभेद होते. त्याचा रोजीरोटीवर परिणाम होणे परवडण्यासारखे नव्हते.

चिन्नम्माच्या हातची 'कापी' प्यायला आजूबाजूच्या ऑफिसातले बरेच लोक यायचे. शेजारीच स्वामीचं दुकान. त्यामुळे कॉफीनंतर हुक्की आली तर पान सिगरेट शेजारीच उपलब्ध. असा दुहेरी नेम साधणारे बरेच दर्दी गिऱ्हाईकं चिन्नम्माने आणि स्वामीने जपली होती. तशी तिची टपरी छोटीच. टपरीच्या समोरच्या भागात सतत कॉफी उकळत असे आणि मागे साखर, कॉफी पावडर, ग्लासेस, भांडी असं इतर साहित्य नीट मांडलेलं असे. सर्वांत मागच्या भिंतीवर एक छोट्या टांगत्या फळ्यावर तीनच गोष्टींचे दर अत्यंत अशुद्धलेखनात लिहिलेले: 'मद्रासी कापी', 'नेस कापी' आणि 'बिस्कुट'. अर्थात ती बनवत असलेल्या कॉफीचा सुगंधच इतका छान असायचा कि त्या दरपत्रकाकडे कोणी पाहत असेल असं वाटत नाही. तिलाही हे कदाचित माहिती असावं आणि म्हणूनच तिने तो फळा अगदी मागे टांगला होता बहुदा फक्त अतिचौकस गिऱ्हाइकांसाठी.

खरंच तिच्या हातची कॉफी प्यायल्यावर कोण तरतरी आणि उत्साह येत असे. बड्या बड्या कॉफीच्या आउटलेट्समध्ये मिळणार नाही असा तिचा स्वाद आणि किंमत अगदीच माफक. कधी कोणी परदेशी पाहुणा ऑफिसमधे आला तर आम्ही गंमतीने म्हणायचो "त्याला जाऊ दे CCD मधे आपण CCS (Chinnamma Coffee Stall) मधेच जाऊ. तिचं कॉफी बनवण्याचं कसब खरंच वाखाणण्याजोगं होतं. फिल्टर (मद्रासी) कॉफी असो वा नेस कॉफी, दोन्हीची वेगवेगळी चव पण खास चिन्नम्मा स्टाइल. ऑफिसमधे सकाळी पोचल्यावर लगेच बाहेर पडता येत नसे म्हणून नाइलाजास्तव त्या घाणेरड्या मशीनची कॉफी प्यावी लागत असे. काम करणारा जसजसा अनुभवी होत जाई तसतसा त्याला चिन्नम्माची कॉफी आणि मशीनची कॉफी यातला फरक कळत असे आणि हळूहळू त्याची मशीनची कॉफी पिण्याची सवय जात असे. शास्त्रीय संगीतातील एखादा राग जसा एखाद्या दर्दी श्रोत्याच्या अंगात भिनत जातो आणि त्याला तडकत्या फडकत्या इन्स्टंट संगीतात काहीही रस वाटेनासा होतो तसंच काहीसं व्हायचं मशीन मेड कॉफीनंतर CCS कॉफीची चव घेतल्यावर.

चिन्नम्मा तशी स्थूलमानाची, कपाळावर आडवा पांढरा भस्मासारखा गंध लावणारी, केसात अबोली रंगाच्या फुलांचा गजरा माळणारी एक अगदी कुठल्याही सर्वसामान्य दक्षिण भारतीय स्त्रीसारखी दिसणारी अशी होती. जेवढी व्यवसायात चोख तेवढीच प्रेमळही होती. कधी कोणी तिला उधारी मागत नसे पण अगदीच वेळ आली तर ती तेवढं समजून घेऊन आलेल्या माणसाला हवी असलेली कॉफी पाजायची. तिच्या हातच्या कॉफीत मायेची एक उब असायची. म्हणूनच बहुदा रोजच चुकता लोक तिच्याकडे दिवसातून एकदा तरी कॉफी प्यायचेच.

रोजच्या गिर्हाइकांसोबत चिन्नम्मा गप्पा मारायची. तिचा भूतकाळ आठवून सुखवायची तर वर्तमानाची चिंता तिला त्रास द्यायची. वर्तमानातील चिंतेचे कारण मुख्यतः तिचे आणि मुलाचे असलेले मतभेद. भविष्याची तशी तिला काळजी नव्हती कारण आयुष्याच्या संध्याकाळी सूर्य कधीतरी मावळ्णारच हे तिला पक्कं ठाऊक होतं. पण हा सूर्य मावळताना अनिश्चिततेच्या ढगांनी झाकोळून जाऊ नये या विचाराने तिचं मन सुन्न व्हायचं. स्वामीचे आणि तिचे छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचे. त्यामुळे ती कधी कधी स्वतःलाच कोसायची आणि स्वामीला वाढवण्यात काय चूक झाली याचा शोध घ्यायची. तिच्याशी बोलायचा जेव्हा योग यायचा तेव्हा ती तिच्या आयुष्याची कथा सांगायची.

तिचं बालपण तामीळनाडूच्या कुठल्याशा एका छोट्या खेड्यात गेलं होतं. तिचे वडील शेतमजूर होते. चिन्नम्मा कुटुंबातील शेंडेफळ. त्यामुळे लाडाकोडात वाढलेली. आईवडिलांनी प्रसंगी पोटाला चिमटा काढून तिचे लाड पुरवलेले. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने आवड आणि इच्छा असूनही तिला शिक्षण चौथ्या इयत्तेच्या पुढे पूर्ण करता आलं नव्हतं. पुढे करायला काहीच नसल्याने आणि एक जबाबदारी कमी व्हावी म्हणून वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. छोटीशी चिन्नम्मा भातुकली खेळता खेळता केव्हा संसारात पडली हे तिचं तिलाच कळलं नाही. नवऱ्यात आणि तिच्यात वयाचा बराच फरक होता. दोघांनाही कळत नव्हतं संसार करायचा म्हणजे नक्की काय करायचं. नवरा तिच्याशी फारसं बोलत नसे.

एक दिवस त्याने घरात सांगून टाकलं कि तो पुण्याला जाणार आहे मित्रासोबत. तिथे एका बांधकाम कंत्राटदाराकडे नोकरी करण्यासाठी. त्याच्या मित्राने पत्र पाठवून त्याला येण्याबद्दल कळवलं होतं. खेड्यात राब राब राबून चार फुटक्या कवड्या हातात पडायच्या. त्याऐवजी शहरात जाउन पैसे कमवावेत आणि सुखाने जगावं हे त्याचं इतर सर्वसामान्यांप्रमाणे एक स्वप्न. त्याच्या आई वडिलांनी त्याला समजावायचा बराच प्रयत्न केला पण सुखी आयुष्याच्या स्वप्नाने त्याला असं काही गारुड घातलं होतं कि तो आता थांबू शकत नव्हता. चिन्नम्माच्या मताचा काही प्रश्नच नव्हता. तो गेल्यावर मग तिने सासरी राहायचं कि माहेरी जायचं हा प्रश्न तिच्या बालसुलभ मनाला पडला होता. वडिलांच्या घरी परत जायला मिळालं तर किती मज्जा येईल या विचारानी ती सुखावत होती. पण सासू सासऱ्यांचा त्याला ठाम नकार होता. बिचारी हिरमुसून गेली. पण तिचं वय असं ते किती होतं. नवरा पुण्याला गेल्याच्या घटनेचा तिला अर्थ कळायच्या आतच सासूने तिला कामाला लावलं. एकेक करत सगळीच घरकामं आता ती करू लागली. ती करता करता कधी मोठी झाली हे तिचं तिलाच कळलं नाही.

असेच दिवस ढकलत असताना एक दिवस सासऱ्याला देवाज्ञा झाली. तो धक्का सासूला काही सहन झाला नाही आणि पुढच्या काही दिवसातच तिने प्राण सोडला. वडिलांचे आणि आईचे रीतसर विधी मुलाने केले. यावेळी मात्र निघताना तो एकटा नव्हता. त्याने चिन्नम्माला सोबत घेतले आणि गाव सोडले. अशा रीतीने चिन्नम्माचा पुण्यात प्रवेश झाला. अनोळखी प्रदेश, नवीन भाषा, नवे लोक सगळंच कल्पनातीत. तिचा एकमेव सहारा म्हणजे तिचा नवरा. तिच्या सुदैवाने तिचा नवरा आता तिच्याशी धडपणे वागत होता. बहुदा इतक्या वर्षांच्या दुराव्याने आणि शहरात राहिल्याने त्याला थोडंसं शहाणपण आलं असावं. जिथे बांधकाम चालू होतं तिथंच त्याची एक खोली होती. कंत्राटदारानेच तशी राहण्याची सोय सगळ्या मजुरांसाठी केलेली होती. हळुहळू चिन्नम्मा आता नव्या वातावरणात रुळायला लागली होती. तिला हे नवीन आयुष्य खरंच सुखकारक वाटत होतं आणि नवऱ्याने शहरात येण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता हे तिला पटू लागलं होतं.

पुण्यात आल्याच्या पुढच्याच वर्षी स्वामीचा जन्म झाला. चिन्नम्माच्या सुखाला आता पारावार राहिला नाही. तिला आता जणू स्वर्गीय सुख मिळालं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. तिच्या स्वाभाविक नियमानुसार तिला सुख आणि दुःख या तिच्या मुलांना सतत फिरवत ठेवावं लागतं. सुख चिन्नम्माच्या घरी चांगलं नांदत असताना नियतीने दुःखाला पाठवलं. एक दिवस कामावर हसतखेळत गेलेला नवरा गतप्राण होऊनच परतला. बांधकामाच्या जागी झालेल्या एका अपघातात त्याने जीव गमावला. चिन्नम्माच्या पायाखालची जमीन हादरली. ती रड रड रडली. डोळ्यातील आसवं संपेपर्यंत धाय मोकलून रडली. नियतीच्या या खो खो च्या खेळात आपण फक्त बघत राहायचे असते आणि आला दिवस आनंदाने जगायचा असतो हि समज येण्याएवढी ती मोठी नव्हती. तिच्या पदरात वर्षाचा स्वामी, नवऱ्याने जमवलेली थोडीशी पुंजी, कंत्राटदाराने सहानुभूतीपोटी केलेली तुटपुंजी मदत आणि समोर मिट्ट अंधार एवढंच होतं. गावाकडे परत जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. तिने हर मानली असती तर स्वतःचा आणि स्वामीचा जीव घेऊन केव्हाच सगळ्या गोष्टी संपवल्या असत्या. पण चिन्नम्मा हार मानणाऱ्यांपैकी नव्हती.

पोटाला सुख आणि दुःख काही कळत नाही. ते त्याची भूक भागवण्यासाठी माणसाला हालचाल करायला भाग पाडतच. चिन्नम्मालाही हातपाय हालवण्यावाचून पर्याय नव्हता. स्वतःपेक्षाही तिला काळजी चिमुकल्या स्वामीची होती. तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी खाल्ल्लेल्या खस्ता आता आठवत होत्या. पोटच्या गोळ्याला वाऱ्यावर सोडायचे नाही आणि त्याची आबाळ होऊ द्यायची नाही हे तिने पक्कं ठरवलेले होते. काय करावे याचा अहोरात्र विचार केल्यानंतर तिने ठरवलं बांधकामाच्या जागी चहा कॉफीची गाडी टाकायची. आजूबाजूला तशी काही सोय नसल्याने तिला आशा होती कि तिला गिऱ्हाईक मिळतीलच. तिने चंग बांधला आणि थोड्याफार ज्या ओळखी झाल्या होत्या त्यांच्या मदतीने तिने गाडी सुरु केली. काम करणारे मजूर, कंत्राटदार आणि कधी कधी साहेबलोकही तिच्याकडे चहा पिण्यासाठी येऊ लागले. रोजच्या शिलकेतून स्वामीचं दूध, घरचं वाणसामान आणि इतर चीजवस्तू ती घेऊ लागली. एकीकडे स्वामीला झोपवून दुसरीकडे व्यवसाय सांभाळायचं कसब तिने चांगलंच अवगत केलं. एकेक शब्द करत मोडकंतोडकं हिंदी आणि मराठीही ती बोलू लागली. 

जसजसे दिवस गेले तसतसं बांधकाम पूर्ण झालं आणि त्या इमारतीत ऑफिसेस सुरु झाली. चिन्नम्माच्या नवऱ्यासोबत काम करणारे मजूर दुसऱ्या जागी निघून गेले. तिला बऱ्याच जणांनी बरोबर चलण्याबाबत विचारलं पण ती काही तिथून हलायला तयार नव्हती. आता तिचा बऱ्यापैकी जम बसला होता आणि तिला तिथून निघून दुसऱ्या जागी पुन्हा नव्याने सुरुवात करणं काही सयुक्तिक वाटत नव्हतं. ती तिथेच राहिली. तात्पुरत्या स्वरूपाचं तिचं घर तिने नीटनेटकं केलं. जोपर्यंत तिथून कोणी हाकलून देत नाही तोपर्यंत तिथेच राहायचं असं तिने ठरवलं. स्वामी आता मोठा होत होता. त्याला जवळच्याच एका NGO चालवत असलेल्या शाळेत तिने भरती केलं होतं. त्याचा अभ्यास घेणे, त्याच्या शाळेच्या इतर गोष्टींमध्ये लक्ष घालणे तिला शक्य नव्हते. ती त्याबाबतीत शाळेतल्या बाईंवर अवलंबून होती. तिच्या सुदैवाने शाळेच्या बाई चांगल्या होत्या आणि त्यामुळेच ती तशी निर्धास्त होती.

चिन्नम्मा, तुम्हारा कॉफी चाय से अच्छा होता है।असं तिला बऱ्याच लोकांनी सांगितल्यामुळे तिने चहाचा पर्याय काढूनच टाकला आणि फक्त कॉफीच बनवू लागली. त्याचा तिच्या व्यवसायावर तसा फारसा परिणाम झाला नाही. तसं होणारच नव्हतं कारण तिच्या हातच्या कॉफीची कमाल.

स्वामी आता कळण्याच्या वयात आला होता. त्याचे आता मित्रगणही जमले होते. तो आता चांगलं मराठी बोलायचा. त्याच्या पंधराव्या कि सोळाव्या वाढदिवशी चिन्नम्माने तो सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून सगळ्यांना रोजच्यापेक्षा कमी दराने कॉफी दिली. पण वर्षानुवर्षे गिऱ्हाईक असलेल्या लोकांनी कमी दराचे कारण समजल्यावर उलट थोडेसे पैसे जास्तच दिले. त्यादिवशी चिन्नम्माला कोण आनंद झाला होता म्हणून सांगू. चिन्नम्मा त्यादिवशी लोकांचे आभार मानून थकत नव्हती. ती प्रचंड खूष होती. झालेली वरकमाई तिने मुलाला दिली मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी. पण स्वामीला त्याचं मोल कळलं नाही. त्याने ते सगळे पैसे मित्रांसोबत दारू पिण्यात उडवले. तो रात्री जेव्हा घरी नशेत आला तेव्हा चिन्नम्माला तो मोठा धक्काच होता. रात्री गोंधळ नको म्हणून तिने त्याला तसाच घरात घेतला. तो नशेतच केव्हा झोपला ते त्याचं त्यालाच कळलं नाही. चिन्नम्मा मात्र रात्रभर जागली. तिला नवऱ्याची तीव्र आठवण झाली. आपण याला वाढवण्यात कुठे चुकलो? आज याचे वडील असते तर तो असा वागला असता का? एक अनेक असे अनंत प्रश्न तिला भेडसावत राहिले. तिचं तिलाच रडू कोसळलं पण नेटाने तिने ठरवलं कि याचा जाब स्वामीला विचारायचा.

सकाळ होताच ती स्वामीवर कोसळली. तिने त्याला अक्षरशः उभा आडवा फटकारला. त्याला फटकारताना तिला रडू येत होतं. जणू तिच्या सगळ्या दुःखांचा राग आता बाहेर पडत होता. तिचा आक्रोश जसा काही देवालाच जाब विचारत होता कुठे आणि काय चुकलं याबद्दल. सोसलेल्या वेदनांचं, भोगलेल्या दुःखाचं, केलेल्या श्रमाचं, मातृवात्सल्याचं हेच का फळ असं जणू ती विचारत होती देवाला. शेवटी आजूबाजूच्या लोकांनी आवरल्यावर तिचा उद्वेग थांबला. तरी अश्रू काही थांबत नव्हते. हा दिवस पाहण्याआधी आपण मेलो का नाही असे तिला वाटून गेले असावे. स्वामी तसाच घरातून निघून गेला. त्यादिवशी चिन्नम्माने दुकान उघडलं नाही. आलेल्या सगळ्या गिऱ्हाईकांना शेजाऱ्यांकडून झाल्या प्रकाराची माहिती मिळत गेली.

रागावून निघून गेलेला स्वामी थेट दुसऱ्या दिवशीच परतला. त्याच्या डोळ्यात आता दुःख दिसत होतं. तो चिन्नम्माची माफी मागून गयावया करू लागला. शेवटी आईचंच काळीज ते. चिन्नम्मानी त्याला माफ केलं आणि जवळ घेतलं. काही दिवस असेच गेले. मग त्या दोघांनी मिळून शेजारी पानाची टपरी चालू करायची ठरवलं आणि स्वामी ती सांभाळेल असं ठरलं. चिन्नम्मानी जमवलेली रक्कम कारणी लावली आणि एक अजून उत्पन्नाचं साधन त्यांनी सुरु केलं. कॉफी प्यायला येणाऱ्या गिऱ्हाईकांची पर्वणीच झाली. आता दोन्ही दुकानं चांगली चालू लागली. चिन्नम्माच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच उत्साह दिसू लागला.

पुढे काही दिवसांनी मी नोकरी बदलली. माझं नवीन ऑफिस शहराच्या दुसऱ्या भागात होतं. नोकरीच्या शेवटच्या दिवशी मी चिन्नम्माला भेटलो. कॉफी पिऊन झाल्यावर मी म्हणालो चिन्नम्मा, अभी कल से मै नही आऊंगा।तिला तर त्याचा अर्थ कळलाच नाही. मग मी तिला नोकरी बदलल्याचं सांगितलं. इतक्या वर्षांचा हा आपला गिऱ्हाईक आता पुन्हा दिसणार नाही हे कळल्यावर तिचा चेहरा थोडा पडला. पण तिच्या स्वभावाला साजेसं असं लगेच तिने स्वतःला सावरलं. स्वामीच्या टपरीवर गेली. तिथल्या एका बरणीतून मोठं चॉकलेट काढून माझ्या हातात ठेवलं. खुश रेहना। कभी इदर आया तो कापी पिने को आना।असं म्हणून ती पुन्हा इतर गिऱ्हाईकांना काय हवं काय नको ते बघायला गेली. माझ्याशी बोलताना ती माझ्यात स्वामीला पाहात होती असं उगाचंच मला वाटून गेलं. त्या चॉकलेटचे पैसे द्यावेत कि नाही हा प्रश्न मला पडला. पण मी ते मुद्दामच नाही दिले. चिन्नम्माच्या त्या प्रेमाचं मला असं मोल करायचं नव्हतं. पुन्हा कधी वेळ आली तर तिच्या या प्रेमाची जरूर परतफेड करेन असं ठरवून मी तिथून निघालो.

काही वर्षांनंतर एका रविवारी माझ्या जुन्या ऑफिसच्या भागातून मला जावं लागणार होतं. सहज डोक्यात विचार येउन गेला त्या भागात चाललोच आहोत तर चिन्नम्माच्या हातची कॉफी आज प्यावी. बायको मुलांनाही मी त्याबाबत सांगितलं आणि तेही आनंदाने तयार झाले. तिथे पोचल्यावर एका जागी गाडी लावली आणि आम्ही सारे उतरलो. चिन्नम्मा मला आता ओळखत असेल कि नाही याची उगाचंच एक धाकधूक मनात होती. तिने ओळख नाही दाखवली तर माझं बायको मुलांसमोर हसं होणार होतं. चिन्नम्माच्या टपरीची जागा जसजशी जवळ येत गेली तसतशी माझी पावलं झपाझप पडू लागली. अचानक एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. पण तिथे पोचल्यावर माझी घोर निराशा झाली. तिथे चिन्नम्माची आणि स्वामीचीही टपरी नव्हती. तिथे आता गाळे बांधलेले होते. क्षणिक वाटलं बहुदा आता चिन्नम्माने गाळा घेतला असावा. सगळे गाळे पहिले पण चिन्नम्माचा कुठे मागमूस दिसेना. कॉफीचा सुवास येणारा तो तिचा गाळा हे वास्तविक मला कळायला हवं होतं पण अशा प्रसंगी बुद्धी कुठली साथ देते. सगळ्या गाळ्यांमध्ये कॉफीचा सुवास येणारा एकही गाळा नव्हता. मी संभ्रमात पडलो. बायको मुलांसमोर आता माझी फजिती होणार होती.

मी समोर असलेल्या ऑफिसच्या सिक्युरिटी केबिनच्या दिशेने गेलो. सुदैवाने तिथे एक जुना गार्ड भेटला. मी त्याला माझी ओळख सांगितली आणि त्यालाही ती पटली. हवापाण्याच्या थोड्या गप्पा झाल्यावर मी त्याला विचारलं:

चिन्नम्मा कुठे आहे?”

           “साहेब गरीबाचं काय घेऊन बसलात? त्यात ती होती दुसऱ्या राज्यातली. तिची खबरबात कोण ठेवतो?”

मी त्याला म्हणलं काहीही असो. तुला जे माहिती आहे ते सांग.

मग त्याने सांगायला सुरुवात केली. त्याच्याकडून मिळालेली माहिती हेलावून टाकणारी होती. मी ते ऑफिस सोडल्यानंतर एक दोन वर्षं सगळं सुरळीत चालू होतं. तिची आणि स्वामीची टपरी चांगली चालली होती. एक दिवस अचानक महापालिकेच्या गाड्या, बुलडोझर आणि पोलिसांच्या गाड्या आल्या. एकेक करत सगळ्या टपऱ्या आणि झोपडी वजा असलेली घरं जमीनदोस्त केली. का तर म्हणे ते सगळं अनधिकृत होतं. चिन्नम्मा, स्वामी आणि तिथले सगळे रहिवासी रडले, पाया पडले अगदी जवळ असलेले पैसेही त्यांनी देऊ केले पण कशाचाही उपयोग झाला नाही. बघता बघता त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचा सगळा संसार, त्यांचं सगळं विश्व जमीनदोस्त झालं. एखादा जोरात दणका बसावा आणि मृत्यूच ओढवावा असंच काहीसं झालं असणार त्यांना. सगळ्यांना तिथून हाकलून लावलं आणि सगळी जागा रिकामी केली. आता गेल्या सहा महिन्यांपासून हे गाळे तिथे बांधून उभे केलेत. हाकलून दिल्यानंतर स्वामी काही दिवसांनी आला होता. विचारपूस केल्यावर सांगितलं कि चिन्नम्माला आता इथे राहायची इच्छा नाही आणि तिला परत गावाकडे जायचे आहे. बहुदा आता ते त्यांच्या गावाकडे असतील.

मी त्या गार्डचे आभार मानले आणि गाडीकडे परतू लागलो. मन खिन्न झालं होतं. नानाविध विचार मनात थैमान घालत होते. पण भानावर येणं आवश्यक होतं कारण सोबत बायको मुलं होती. इच्छा नसतानाही त्या विचारांना बगल देऊन मी गाडीत येऊन बसलो.

आज CCS बंद आहे, जवळच्या CCD जाऊमी म्हणलं.

सगळे त्यामुळे खुश. कारण मी जे CCS चं वर्णन केलं होतं त्यावरून त्यांनी जो अंदाज बांधला असावा त्याने ते जरा टेन्शनमधेच होते बहुतेक.

रात्री घरी पोचल्यावर झोपायच्या आधी बाल्कनीतल्या खुर्चीवर जरा बसलो. अर्थातच डोक्यात विचार चिन्नम्माचे होते. कशी असेल ती? कुठे गेली असेल? जिवंत असेल? स्वामी काय करत असेल? त्याने काही पुन्हा त्रास तर दिला नसेल? अनंत प्रश्न डोक्यात घोंघावत होते. छोट्याशा चिन्नम्माचं लहान वयात लग्न काय होतं, नवरा संसार धड करता तिला एकटीलाच सोडून काय येतो, सासू तिचा छळ काय करते, मग पुण्याला येऊन सुखाची एक लहर काय येऊन जाते, एकाएकी नवरा काय जातो आणि नंतर पोटचा पोरगा असा काय वागतो. एखादाच्या जीवनात एवढी उलथापालथ कशी असू शकते? सहजसोपं आयुष्य जगू पाहणाऱ्यांचं आयुष्य इतकं क्लिष्ट कसं असु शकतं? जिथे नवऱ्याने घाम गाळला त्या इमारतीसमोर ती त्याचे स्मारक समजून आयुष्यभर जगली. त्या इमारतीतच तिला तिचा नवरा दिसत असावा. तो आपल्याकडे लक्ष ठेवून आहे अशी तिची समजूत असावी. या सगळ्या विचारांनी उगाचंच भरून आलं.

बराच उशीर झाला तरी मी झोपायला आलो नाही म्हणून बायको बाल्कनीत आली. तिच्या हातात कॉफीचे दोन मग.

काय आज झोपायचं नाही वाटतं?” कॉफीचा मग पुढे करत ती म्हणाली.

           मी उगाचच खाकरून तिने पुढे केलेला मग घेत म्हणालो “Thanks. नाही गं. येतच होतो”.

खास मद्रासी स्टाईलने बनवली आहे. YouTube वर बघूनती म्हणाली.

मी तिच्या त्या प्रेमाची पोचपावती म्हणून कॉफीच्या एकेक घोटाचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि चिन्नम्मा जिथे कुठे असेल तिथे तिला सुखी ठेव अशी ईश्वराकडे प्रार्थना केली. आजही जेव्हा जेव्हा कॉफी प्यायची वेळ येते तेव्हा तेव्हा मन नकळत चिन्नम्माच्या आठवणीत रमते आणि कॉफीचा तो कडवटपणा अधिकच भावू लागतो.


No comments:

Post a Comment