Friday, 7 April 2017

म्हणजे कसं असतं ना...

म्हणजे कसं असतं ना
आपला जन्म होतो
सगळे खुश असतात
आपल्याला काहीच कळत नसतं
प्रश्न एकच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
आपण मोठे होतो
शाळेत जायला लागतो
सगळ्यांना खूप उत्साह असतो
आपल्याला काहीच कळत नसतं
प्रश्न एकच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
आपण तारुण्यावस्थेत जातो
कॉलेजमधे जाऊ लागतो
सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो
आपल्याला काहीच कळत नसतं
प्रश्न एकच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
कॉलेज संपवून आपण
नोकरी किंवा व्यवसाय करू लागतो
सगळ्यांना खूप अभिमान वाटत असतो
आपल्याला काहीच कळत नसतं
प्रश्न एकच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
नोकरी करता करता
आपलं लग्न होतं, संसार सुरु होतो
सगळ्यांना अतीव आनंद झालेला असतो
आपल्याला काहीच कळत नसतं
प्रश्न एकच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
संसार करता करता
आपल्याला मुलं होतात
आपल्याला काहीच कळत नसतं तरी
सगळ्यांसोबत आपणही आनंदी असतो
तरीही प्रश्न तोच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
मुलं हळूहळू मोठी होतात
आपण ज्या जीवन चक्रातून आलो
त्यातूनच त्यांचा होणारा प्रवास पाहून सुखावतो
पण प्रश्न एकच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
अंतिम घटिका मोजताना एक दिवस
आयुष्यभर सतावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर
मिळालं असं वाटतं पण ते सांगायला जावं
तर बोलता येत नसतं,
बोलता आलं तर ऐकायला कुणी नसतं
अशा परिस्थितीत प्रश्न तोच पडतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना
शेवटचा श्वास घेतल्यावर
सगळे दुःख व्यक्त करतात
सुटला सगळ्यातून एकदाचा म्हणतात
पण म्हणे आपला चिरंतन आत्मा
कुठे तरी पुन्हा ट्याहया करतो
त्या रडण्यात प्रश्न पुन्हा तोच असतो
मी इथे का आलो?

म्हणजे कसं असतं ना...

No comments:

Post a Comment