जिकडे तिकडे चोहीकडे
फ्लेक्सच फ्लेक्स दिसती खडे
काही छोटे काही बडे
प्रत्येकाचे अजबच रुपडे
काका, मामा, दादा, भाऊ
फ्लेक्स वेगळा प्रत्येकाचा पाहू
शक्तिप्रदर्शन करती कोणी दाखवून बाहू
तर कोणी जणू म्हणते गिळू कि खाऊ
पैलवान मिरवती सुवर्णालंकार भारी
फिकी पडते रूपात बाजूच्या फ्लेक्सवरील नारी
कुणाची दाढी कुणाचा फेटा तर कुणाची मिशीच न्यारी
गल्लीलाही प्रथमच कळते कशी दिसते ती स्वारी
प्रतिवर्षी जन्माष्टमीला साधारण सुरु होतो हंगाम
गणेशोत्सवात तर गणेशालाही फुटतो घाम
नवरात्री, दसरा-दिवाळीतील काय वर्णावा तामझाम
हॅपी न्यु ईयर नंतरच थोडासा मिळतो आराम
वाढदिवस, निवडणूक वा असो आलेला पहिला नंबर
सगळ्यांचीच शान किती असो वयवर्ष एक वा शंभर
जयंती पुण्यतिथी प्रसंग किती हे ढीगभर
दिवस कमी पडती तरी उत्सव चाले वर्षभर
महंतांच्या प्रतिमा फ्लेक्सवर कुठेतरी कोपऱ्यात
गल्लीतील चिल्लीपिल्ली मात्र त्यावर मिरवती दिमाखात
कशात नाही काही तरी धन्यता वाटे फ्लेक्सवर झळकण्यात
मूल्यवान ते तारुण्य चालले बिनकामी शेखी मिरवण्यात
येता जाता मंदिरातील देवाला करतो मी प्रार्थना
कृपा कर आणि सद्बुद्धी दे या सर्वांना
दिसत नाही तरीही फ्लेक्सची संख्या कमी होताना
मग उमजले दिसणार मी कसा देवाला मंदिरापुढे फ्लेक्स असताना
No comments:
Post a Comment