Friday, 6 May 2016

देवाला नमस्कार!

मी जेव्हा जेव्हा देवाची मूर्ती पाहतो
देवाला नमस्कार करतोच करतो
तो माझ्याकडे पाहतो कि नाही ठाऊक नाही
पण मी त्याच्याकडे पाहुन नमस्कार करतो

मी प्रत्येक मंदिरासमोर नमस्कार करतोच
पण मी जेव्हा जेव्हा देवघरासमोरुन जातो
तेव्हा प्रत्येक वेळी देवाला नमस्कार करतो
तो माझ्याकडे पाहतो कि नाही ठाऊक नाही
पण मी त्याच्याकडे पाहुन नमस्कार करतो

मी रोज सकाळी पूजा करुन फुलं वाहतो
धूप उदबत्त्या लावून सगळीकडे धूर करतो
शेजारी बसलेला ठसक्याने हैराण होतो
तरीही मी देवाला नमस्कार करतो
तो माझ्याकडे पाहतो कि नाही ठाऊक नाही
पण मी त्याच्याकडे पाहुन नमस्कार करतो

मी न चुकता मंदिरातल्या देवाला अभिषेक करतो
माझ्याकडे लक्ष ठेव अशी विनवणी करतो
मंदिराबाहेरील भिकार्याकडे करुणेने पाहुन पुढे जातो
मागे वळुन पुन्हा देवाला नमस्कार करतो
तो माझ्याकडे पाहतो कि नाही ठाऊक नाही
पण मी त्याच्याकडे पाहुन नमस्कार करतो

गुरुंच्या मठात मी नेहमी जातो
त्यांची सेवा म्हणून दर महिन्याला देणगी देतो
परतताना भाजीवाल्याशी दहा रुपयांसाठी घासाघीस करतो
अंमळ चार भेंड्या जास्त मिळाल्याने खुश होतो
देव माझ्याकडे पाहतो कि नाही ठाऊक नाही
पण मी त्याच्याकडे पाहुन नमस्कार करतो

देव एकदा स्वप्नात आला म्हणाला एक गोष्ट सांगतो
तु जिथे जिथे नमतोस मी तिथे नसतो
ज्याच्याशी तु भांडलास तो भाजीवाला मी होतो
ज्याला अव्हेरलेस तो भिकारी मी होतो
तु जेव्हा जेव्हा माझ्याकडे पाहुन नमस्कार करतो
तेव्हा तेव्हा मी तुला बाजूला उभा राहुन पाहतो

का तु मला विनाकारण मुर्त्यांमध्ये शोधतो
मी सर्वत्र आहे अगदी तुझ्यातही वास करतो
खुळ्या कल्पना आणि अंधश्रद्धेला का जोपासतो
माणसांतला माणूस ज्याला दिसतो
त्यालाच मी डोळे भरून पाहतो

No comments:

Post a Comment