Saturday 16 April 2016

रस्त्यांवरची झाडं

शहरातल्या रस्त्यांवर झाडं दुतर्फा
बंदोबस्ताच्या सैनिकांचा जणू ताफा
धूळ धुराचे लोट सोसत
सदैव दिमतीला उभा

जो तो आपल्या घाईत
वेळ कुणा पहायला
झाडे झुंजती उन पावसाशी
छत्रछाया देण्या वाटसरुला

या झाडांनाही फुटते पालवी
लागती गोमटी फळे
एकवार पाहता त्यांना
सुख डोळ्यांना मिळे

उरलेसुरले थोडे पक्षी
करती खोपा याच झाडांवर 
रोजच्या गोंगाटात पडणार कशी
चिवचिव पिलांची कानावर

चाफ्याची फुले पांढरीच
अाणि पिवळाच बहावा
डोळे भरुनिया कधी
आंब्याचा मोहोर पहावा

नारळाची गगनभरारी
गुलमोहोराची लाल फुलं
गळक्या नळापाशी
उभं रोप पिटुकलं

वाटसरु कधी यांच्या
विसावे सावलीत
तीच छाया तीच माया
जी माऊलीच्या पदरात

बहरलेल्या वा सुकलेल्या
नका हो डहाळ्या तोडू
पानंफुलं वाढविती शोभा
नका त्यांना हो ओरबाडू

हिच झाडे फुंकती
शहरातील हवेत प्राण
असती निरपेक्ष किती
करीती सहज जीवनदान

निसर्गाची किमया सारी
किती सोसती तरी जगती झाडं
नका समजू त्यांना
हिरव्या पानांची लाकडं

जतन करा हो हे धन
देवाजीनं जे दिलं
विचारील जेव्हा तो भेटल्यावर
तेव्हा कळंल ते पाहायाचंच राहिल

No comments:

Post a Comment