Thursday 7 April 2016

वाहतुकीचे नियम पुस्तकापुरतेच ठीक बुवा!

वाहतुकीचे नियम पुस्तकापुरतेच ठीक बुवा
आम्ही सदैव घाईत आमच्यासाठी सिग्नल नेहमीच हिरवा
उगीचच असतो लाल अाणि पिवळा दिवा
कशासाठी थांबून वेळ दवडावा?

आम्ही सुसाट आमची गाडी बुंगाट
आम्हाला रोखायची धमक कुणाच्या अंगात
असते कसली घाई आम्हालाही ठाऊक नाही
सिग्नल म्हणजे वेळ वाया, तो आमच्यासाठी नाही

लेन कटिंगची असते वेगळीच नशा
भर ट्राफीक मध्ये येते फॉर्म्युला वनची मजा
राँग साईडने जाण्यात काय आहे चुक
प्रवाहाविरुद्ध जाणारे आम्ही रॉबिनहुड

झेब्रा क्रॉसिंग म्हणजे रस्त्यावरील नक्षीकाम
थांबलोच तर त्यावरच थांबतो पादचारी पुसती घाम
म्हातार्या लोकांनी तर क्रॉस करण्याचे धाडस करूच नये
आमच्या वेगात व्यत्यय आणून पंगा नसता घेऊ नये

वळताना इंडिकेटर थोडाच दाखवायचा असतो
मागून येणार्याने आमच्या वळण्याचा अंदाज बांधायचा असतो
चुकला अंदाज आणि जर झालीच धडक
गाडीवरून असलो पडलो तरी भांडायला उठतो तडक

वेगे वेगे जाता जाता पिंकदाणी होतो रस्ता
लाल नारंगी तांबुल तर कधी थुंकतो गुटखा
मागून येणार्याने आम्हाला टोकायचं नाही
उन्मत्त रंगारी फिरतात मोठ्या गाड्यांमधूनही

नियम मोडल्याबद्दल कधी अडवलेच जर कुणी
शिव्याच फक्त सुचतात बंद होतात हेडफोनची गाणी
हेल्मेट नाही सीट बेल्ट नाही हि काय कारणं आहेत
दंड भरण्यासाठी खिशात हिरव्या पत्तीची तोरणं आहेत

आमचं आम्ही बघून घेऊ सल्ले देता कशाला
तुमचं ठेवा तुमच्यापाशी नका शिकवू आम्हांला
घरचे करती चिंता, माय उगाच लावी देवापुढे दिवा
वाहतुकीचे नियम पुस्तकापुरतेच ठीक बुवा

No comments:

Post a Comment