एका रम्य सकाळी
फुलली नाजूक गुलाबकळी
बाहेर पडली हळूच कोषातून
आनंदे डोलू लागली फुल होऊन
रुपास ना तोड त्याच्या
रंग लोभस नाजूक पाकळ्यांचा
हिरवे छान देठ रुबाबदार
तीक्ष्ण काटे जसे राखणदार
आली पहा हलकेच झुळूक वाऱ्याची
हर्षोल्हासित होई स्वारी गुलाबपुष्पाची
पसरे मोहक सुगंध आसमंतात
फुलपाखरे खेळती त्यासंगे येऊनी रंगात
अशाच सुंदर धुंद क्षणी
कुठुनसा अचानक आला कोणी
पाहूनी सौंदर्य त्या फुलाचे
काट्यांवर मात करुनी तो त्यास वेचे
ऐकून कोलाहल टोपलीतल्या फुलांचा
न उमगे गुलाबाला आता प्रवास कुठचा
गोंधळलेली फुले बिचारी
पोचली सकाळच्या बाजारी
गुलाबास मिळाली पहिली पसंती
त्यास वाटे आता संपली भ्रमंती
इतक्यात तोडून पाने अन छाटून काटे
त्यास बसविले पुष्पगुच्छामधे
कोणत्याश्या एका समारंभी
पोचला गुच्छ बहुरंगी
देता पाहुण्यास तो वंदून
बाजूस ठेवला तो स्वीकारुन
संपता कार्यक्रम गेले सारे निघून
कोपऱ्यात पुष्पगुच्छ राहिला निपचीत पडून
जीवनपट सरला क्षणात गुलाबाच्या चक्षु पटलावर
दिसला अंत त्यास जेव्हा फेकला कचऱ्यावर
रे माणसा किती होशील निष्ठुर
होऊ नकोस निसर्गाप्रती तू क्रुर
वदले तुकोबा वृक्षवल्ली आम्हां सोयरे
शिकवण ती विसरून तु वागशी असा का रे
हवेत कशाला पुष्पगुच्छ अन पुष्पहार
फुकाचे कौतुक क्षणभर होतो नाजूक फुलांवर अत्याचार
प्रेम करू या पानाफुलांवर त्यांना जपून
निसर्गही मग देईल मानवास भरभरून