Wednesday 22 February 2017

आम्ही रंगारी


जगात भारी आम्ही रस्त्याचे रंगारी
रंगवितो रस्ता उडवून मुखातून पिचकारी
कुणाची लाल, कुणाची तांबडी तर कुणाची केशरी
नेम धरून उडवण्यात आमची खरी कलाकारी

भिकारी ते पुढारी सारेच रंगारी
काही तर चालविती उंची मोटारी
रंगकाम चाले दिवसा अन रात्री
कुणाचे काम हळू तर कुणाची अविरत फॅक्टरी

बिनधास्त हे पाहा यांची बेफिकिरी
इमारतीच्या जिन्यामधला देवही जीव मुठीत धरी
कुणाची छोटीच तर कुणाची लांबसडक अदाकारी
गलिच्छ काम करूनही चेहऱ्यावर मगरूरी

यांना न तमा कुणाची यांची बातच न्यारी
स्वच्छता अभियानाला यांनी फेकले माळ्यावरी
पान, गुटखा, तंबाखूशी यांची घनिष्ट यारी
स्वच्छ, शुद्ध या शब्दांनीच यांना येई शिसारी

यांच्याच धुंदीत हे नकोत बोल कुणाचे उपदेशापरी
स्वकष्टाच्या कमाईनेच खाऊन रंगवतो हि गुर्मी उरी
क्षयरोग, प्रदूषण, घाणीची चिंता इतरांनीच केलेली बरी
रंगकामात तशी नाही काही मजा पण सवयीनेच ओढतात री

रंगाऱ्यांनो तुमची नक्षी पाहण्याची का इतरांस बळजबरी
पुढची पिढी असेलच कि वाढत तुमच्याही घरी
स्वच्छ सुंदर आरोग्यमय परिसर हि तर सर्वांचीच जबाबदारी
द्या हो सोडून रंगकाम फुलवू या नंदनवन दारोदारी