Saturday 23 April 2016

साहेबाचे श्वान

साहेबाचे श्वान त्याची आगळीच शान
उठणे झोपणे कधीही नाही वेळेचे भान 
कामावर जाण्याची काही लगबग नाही 
उठते आरामात देत मनसोक्त जांभई 

साहेबाचे  श्वान करिती न्याहारी छान
रोज दुध अंडी खाऊन बनते ताकदवान 
धावपळीत निघती आमच्या न्याहारीचे वाभाडे 
वेळ मारुन नेतो खाऊन चार तुकडे 

साहेबाचे  श्वान त्याला पाहती सारे कौतुकानं 
पायाशी घुटमळते येते लाडात शेपटी हलवून 
आम्ही स्वत:चे करतो कौतुक मनातल्या मनात 
कितीही हलवली शेपटी तरी येत नाही साहेबाच्या ध्यानात 

साहेबाचे श्वान रोज करिती पौष्टिक सेवन 
मिळती गोडाचे पदार्थ करुन सामीष भोजन 
अर्ध्या तासाच्या सुट्टीत आम्ही उरकतो जेवण 
जेवण कसले ते तर निव्वळ उदरभरण

साहेबाचे श्वान नाजूक त्याला सोसत नाही उन 
त्याच्या टुमदार घरावर  काढली नक्षी कोरून
कामासाठी आमुची उनपावसात वणवण 
घराच्या दारावर आमच्या कृत्रीम तोरण 

साहेबाचे श्वान त्याचे सारे गाती गुणगान 
फिरते गाडीतून पाहते वर्दळ उंचावून मान 
आमची मात्र रोजच फरपट आणि ओढाताण 
घाण्याला जुंपलेल्या बैलाची सदैव झुकलेली मान 

साहेबाचे श्वान आले मनात कि टाकते भुंकून 
त्याला थोडेच राहायचे लोकमन राखून  
आमच्या शब्दांना सदोदित साखरेचे आवरण 
निषेधाचे नाराजीचे काही शब्दच गेले विसरून

साहेबाचे श्वान म्हणे करीती हलका मनावरचा ताण
साहेब फिरे दूरदेशी स्फुंदते त्याच्यापाशी साहेबीण  
ताणतणावातच चाललं आयुष्य आमचं
आता ऐकूही येत नाही म्हणणं मनाचं  

साहेबाचे श्वान पाहतो आम्ही गपगुमान 
आमचे आयुष्य जमीन तर त्याचे आसमान 
दुनिया चाले उलटी कशी जाणे तो भगवान 
प्रार्थना एकच करावे पुढच्या जन्मी आम्हांस श्वान  

1 comment: